हॉलिवूड अभिनेता Tom Cruise ला चोरांनी लुबाडले; BMW कार व गाडीतील कोट्यावधी रुपयांचे सामान चोरीला
Tom Cruise (Photo Credit: Twitter)

चोरांचे शिकार हे फक्त सामान्य लोकच होत नाहीत तर मोठ-मोठ्या सुपरस्टार्सनाही चोरांनी लुबाडण्याच्या घटना घडल्या आहेत. आता चोरांनी चक्क हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझला (Tom Cruise) लक्ष्य केले आहे. नुकत्याच घडलेल्या एका चोरीमुळे सुपरस्टार टॉम क्रूझला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. त्याचे हजारो पौंड किमतीचे सामान कारमधून चोरीला गेले. टॉमचे सामान त्याच्या अंगरक्षकाच्या बीएमडब्ल्यू कारमध्ये (BMW Car) ठेवले होते. असे सांगितले जात आहे की, चोरांनी अंगरक्षकाची कार चोरली, ज्यामुळे त्यामध्ये ठेवलेले सामानही चोरीला गेले.

टॉम क्रूझ हा मिशन इम्पॉसिबल 7 या चित्रपटाचे शूटिंग बर्मिंघममध्ये करत होता, त्यावेळी ही कार व सामान चोरीला गेले. अर्थातच चोरांकडे कारची चावी नव्हती, त्यामुळे त्यांनी एका विशेष प्रकारच्या स्कॅनरचा वापर करून तो इग्निशन फोबशी जोडला. यावेळी कार बर्मिंघम येथील एका ग्रँड हॉटेलजवळ उभी केली होती. आपले सामान चोरीला गेल्याची बातमी समजतात टॉम क्रूझचा राग अनावर झाला.

द सनच्या वृत्तानुसार, टॉम क्रूझ बर्मिंघममध्ये शूटिंगमुळे या कारमधून प्रवास करत होता. सध्या या गाडीचा पोलिसांनी शोध घेतला आहे. ही कार अतिशय आधुनिक आहे आणि विविध इलेक्ट्रॉनिक ट्रॅकिंग उपकरणांनी सुसज्ज आहे, ज्यामुळे ती ट्रॅक करणे खूप सोपे होते. पोलिसांना कार सापडली आहे पण चोरांनी कारमध्ये ठेवलेले अभिनेत्याचे सामान चोरले. (हेही वाचा: Asha Bhosle यांच्या युके मधील Asha's मध्ये हॉलिवूड अभिनेते Tom Cruise ने घेतला Chicken Tikka Masala चा आस्वाद (पहा फोटो)

टॉमचा अंगरक्षक, ज्याच्या मालकीची ही कार होती, तो अभिनेत्याच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचाही प्रभारी आहे. अंगरक्षकाने सांगितले की, त्याला बुधवारी सकाळी लक्षात आले की पार्किंगच्या जागेत बीएमडब्ल्यू एक्स 7 नाही. त्याने ताबडतोब पार्किंगच्या जागेपासून थोड्या अंतरावर असलेल्या पोलीस मुख्यालयात चोरीची माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यानंतर अभिनेत्याची कार बर्मिंघममधील चर्च स्ट्रीटमधून जप्त करण्यात आली होती पण त्यामध्ये सामान नव्हते.