मराठी रंगभूमीवरची अजरामर शोकांतिका ‘नटसम्राट’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला?

कुसुमाग्रज वि वा शिरवाडकर लिखित 'नटसम्राट' हे नाटक मराठी रंगभूमी वरचं अजरामर नाटक आहे. अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका करणं हे प्रत्येक मराठी कलाकाराचं स्वप्न होतं आणि आजही ते आहेच. सतीश दुभाषी, यशवंत दत्त, डॉ श्रीराम लागू, दत्ता भट्ट ह्यांच्या सारख्या अनेक महान कलावंतांनी हि भूमिका केली. इतकंच नव्हे तर नाना पाटेकरांनी सुद्धा रुपेरी पडद्यावर नटसम्राट साकारला.

झी मराठी हॅम्लेट, अलबत्या गलबत्या ह्या नाटकांच्या यशा नंतर आता नटसम्राट पुन्हा एका रंगभूमी वर आणण्याच्या प्रयत्नात आहेत. एका मराठी वृत्तवाहिनीला मिळालेल्या विशेष बातमीनुसार जेष्ठ अभिनेते मोहन जोशी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर कावेरीची भूमिका अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी साकारणार आहेत. नाटकाच्या तालमीला सुरुवात झाली असून ४ नोव्हेंबरला रंगभूमीवर येण्याची शक्यता  आहे.

ह्या आधी झी मराठीने अष्टविनायक, जिगीषा, अद्वैत ह्या बड्या नाट्यसंस्थांसोबत हॅम्लेट आणि अलबत्या गलबत्या नाटकांची निर्मिती केली आहे. शिवाय दिलीप प्रभावळकर मुख्य भूमिकेत असलेल्या अरण्यक हे नाटक सुद्धा झी रंगमंचावर आणत आहेत. एकूणच मराठी रसिकांसाठी येणारे काही महिने खूप उत्सुकतेचे जाणार आहेत. मराठी रंगभूमीवरील सध्याची ही '6' दर्जेदार नाटकं पाहिलीत का ?