'दहा बाय दहा' नाटकाद्वारे विजय पाटकर, प्रथमेश परब मराठी रंगभूमीवर देणार विनोदाची फोडणी
Daha By Daha | (File Photo)

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत विनोदी अभिनेते म्हणून ओळखले जाणारे अभिनेते विजय पाटकर (Vijay Patkar) तब्बल 20 वर्षांनतर पुन्हा एकदा रंगभूमीवर परतत आहेत. मधल्या काळात अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केल्यानंतर पाटकर यांची पावले पुन्हा एकदा रंगभूमीकडे वळली आहेत. आता ते 'दहा बाय दहा' या नाटकाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. पाटकर यांचे 'दहा बाय दहा' (Daha By Daha) गुढी पाडव्या दिवशी म्हणजेच येत्या 6 एप्रिल रोजी रंगभूमीवर येत आहे.

अनिकेत पाटील यांनी दिग्दर्शित केलेले 'दहा बाय दहा' हे नाटक विनोदी आहे. या नाटकात विजय पाटकर यांच्यासोबत प्रथमेश परब (Prathamesh Parab) , सुप्रिया पाठारे हे कलाकार असणार आहेत. तर, विदिशा म्हसकर हा नवा चेहराही या नाटकाच्या निमित्ताने पुढे येताना दिसणार आहे. स्वरूप रिक्रिएशन अँड मीडिया प्रा.लि. निर्मित व अष्टविनायक प्रकाशित असे हे नाटक संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहे.नाटकाचं लेखन संजय जामखंडी आणि वैभव सानप यांनी केलं आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबाची गोष्ट घेऊन येत असलेलं हे नाटक, सामान्य माणसांना चौकटीबाहेर जाऊन विचार करण्यास प्रेरीत करु शकेल असे 'दहा बाय दहा'च्या टीमला वाटते. (हेही वाचा, Kaagar Movie Official Teaser Release; पाहा रिंकू राजगुरु हिचा नवा अंदाज (व्हिडिओ))

'दहा बाय दहा' च्या घरात हसत खेळत जगणाऱ्या या कुटुंबाला एका अनपेक्षित घटनेला सामोरे जावं लागतं, त्यानंतर त्यांच्यासोबत काय होतं? त्यातून ते कसा गोंधळ घालतात? हे सारं काही अगदी विनोदी ढंगात प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.