Daha By Daha

दहा बाय दहा (Daha By Daha) या नाटकाचा 25 प्रयोग मुंबई (Mumbai) शहरातील बोरिवली (Borivali) येथे प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात साजरा झाला. दरम्यान, दहा बाय दहा नाटकाच्या कलाकारांनी 25 व्या प्रयोगाचा आनंद प्रेक्षकांसोबत साजरा केला. उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडलेल्या या प्रयोगाअंती स्वत: विजय पाटकर यांनी प्रेक्षकांना रंगभूमीवर बोलावून घेत, त्यांच्याहस्ते रौप्य प्रयोगाचा केक कापत आनंद साजरा केला. मुंबईतील एन भरपाऊसातही बोरिवलीकरांनी रात्रीच्या प्रयोगाला उपस्थिती लावत, 'दहा बाय दहा' च्या कलाकारांचे मनोबल वाढवले.

स्वरूप रिक्रीएशन अँड मीडिया प्रायवेट लि. निर्मित व अष्टविनायक प्रकाशित 'दहा बाय दहा' हे नाटक अनिकेत पाटील यांनी दिग्दर्शित केलं असून, यामध्ये विजय पाटकर यांच्यासोबत प्रथमेश परब, सुप्रिया पाठारे आणि विदीशा म्हसकर हे कलाकार काम करत आहेत. या नाटकाचं लेखन संजय जामखंडी आणि वैभव सानप यांनी केलं असून, हे नाटक वारंवार पाहिले तरी कंटाळा येणार नाही असे आहे. (हेही वाचा, 'दहा बाय दहा' नाटकाद्वारे विजय पाटकर, प्रथमेश परब मराठी रंगभूमीवर देणार विनोदाची फोडणी)

एका मध्यमवर्गीय कुटुंबाची गोष्ट घेऊन येत असलेलं हे नाटक, सामान्य माणसांना चौकटीबाहेर जाऊन विचार करण्यास प्रेरीत करु शकेल असे 'दहा बाय दहा'च्या टीमला वाटते.'दहा बाय दहा' च्या घरात हसत खेळत जगणाऱ्या या कुटुंबाला एका अनपेक्षित घटनेला सामोरे जावं लागतं, त्यानंतर त्यांच्यासोबत काय होतं? त्यातून ते कसा गोंधळ घालतात? हे सारं काही अगदी विनोदी ढंगात प्रेक्षकांना पहायला मिळतं.