अभिनेता प्रशांत दामले (संग्रहित संपादित प्रतिमा)

कोरोना विषाणूने (Corona Virus) बघता बघता देशात महाकाय रूप धारण केले आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मॉल्स, जिम्स, जलतरण तलाव इ. गोष्टी बंद ठेवण्यात आल्या आहेत. अनेक कंपन्या बंद झाल्या आहेत, तसेच देशातील चित्रपट आणि मालिकांचे शुटींग 31 मार्च पर्यंत स्थगित करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत चित्रपटगृह, नाट्यगृह अशा गोष्टींवर ज्यांचा उदरनिर्वाह चालतो अशा लोकांची अडचण झाली आहे. मात्र अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) त्यांच्या मदतीला धावले आहेत. प्रशांत दामले यांनी अशा लोकांना 10 हजाराची मदत जाहीर केली आहे.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नाट्यगृह बंद केली असताना, हातावर पोट असणाऱ्या नाट्यकुटुंबातल्या 23 जणांना प्रशांत दामले यांनी प्रत्येकी दहा हजार रुपये दिले आहेत. नाट्य व्यवसाय पुन्हा कधी मार्गावर येतील हे काही सांगता येत नाही, त्यामुळे प्रशांत दामले यांनी केलेली ही मदत अशा लोकांना नक्कीच दिलासादायक ठरू शकेल. अभिनेता पुष्कर श्रोत्री याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली.

कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे सध्या नाट्यगृहे आणि प्रयोग बंद आहेत. मात्र यामुळे मुंबईच्या रंगमंच संघटनेच्या सदस्यांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे. नाट्यव्यवसायाशी निगडीत अनेकांचे पोट हे याच गोष्टीवर अवलंबून आहे, त्यामुळे त्यांना ही परिस्थिती अशीच राहिली तर पुढे काय? असा प्रश्न आ वासून उभा आहे. अशा लोकांसाठी सध्या रंगमंच कामगार संघटनेतर्फ 2 हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे. या कामगारांची संख्या 350 हून अधिक असल्याने यासाठी 7 ते 8 लाखाची तरतूद करण्यात आली आहे. (हेही वाचा: Coronavirus Outbreak: कोरोना व्हायरसमुळे हिंदी चित्रपट सृष्टीचं 800 कोटी रुपयांचं नुकसान)

दुसरीकडे कोरोना विषाणूच्या वाढत्या घटना पाहता, सुरक्षेचा उपाय म्हणून चित्रपटांचे चित्रीकरण रद्द करण्यात आले आहे. या महिन्यात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनाही कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. या सर्व बाबींचा विचार करता कोरोना विषाणूमुळे बॉलिवूडचे 800 कोटींचे नुकसान झाल्याचे दिसत आहे.