जगभरात एक मोठी समस्या बनलेल्या प्राणघातक कोरोना विषाणूने (Coronavirus) आता बॉलिवूड (Bollywood) मध्येही शिरकाव केला आहे. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की, बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता करीम मोरानीच्या (Producer Karim Morani) दोन्ही मुली कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यानंतर या दोघींनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता करीम मोरानी यांची कोरोना टेस्टदेखील पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर करीम मोरानी यांना नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. करीम मोरानी हे 'चेन्नई एक्सप्रेस', 'राजा हिंदुस्तानी', 'हैप्पी न्यू ईयर' यांसारख्या चित्रपटांचे निर्माते आहेत.
करीम यांचे कुटुंब हे बॉलिवूडमधील एक लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध कुटुंब आहे. हे बॉलिवूड आणि सिनेमा जगताशी संबंधित कार्यक्रमांचे आयोजन करतात. करीम आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत मुंबईच्या जुहू (Juhu) भागात राहतात, जिथे बॉलिवूडमधील इतरही बरीच स्टार मंडळींचे वास्त्याव्य आहे. हे जुहू परिसरातील पहिले कोरोना पॉझिटिव्ह प्रकरण आहे, ज्यामुळे संपूर्ण भागात तणावाचे वातावरण आहे. सध्या करीम यांचे घर पूर्णपणे सील करण्यात आले असून, त्यांच्या उर्वरित कुटूंबाची तपासणी सुरु आहे. (हेही वाचा: गायिका कनिका कपूर हिला डिस्चार्ज, अखेर सहावी कोरोना व्हायरस चाचणी आली निगेटीव्ह)
नुकतीच राजस्थानमधून परतलेली अभिनेत्री झोया मोरानी (Zoa Morani) मंगळवारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. सोमवारी शाजा मोरानी (Shaza Morani) मध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची पुष्टी झाली. मार्चमध्ये शाजा श्रीलंकेत गेली होती. प्राप्त माहितीनुसार, शाजा विलेपार्ले येथील नानावटी रुग्णालयात दाखल आहे, तर झोया अंधेरी पश्चिम येथील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल आहे. शाजा आणि झोया दोघांचीही परिस्थिती सुधारत आहे मात्र शाजाच्या अजून दोन चाचण्या होणार आहेत. करीम मोरानी हे शाहरुख खानसमवेत त्याचे प्रॉडक्शन हाऊस 'रेड चिली एंटरटेनमेंट' शी जोडले गेले आहेत.