Coronavirus बाबत जनजागृती करण्यासाठी WHO चे डायरेक्टर टेड्रोस यांचे 'Safe Hands' चॅलेंज स्वीकारण्याचे दीपिका पदुकोण आणि प्रियंका चोप्रा यांना आवाहन
Priyanka Chopra and Deepika Padukone (Photo Credits: Instagram)

जगभरात दहशत पसरवणाऱ्या कोरोना व्हायरसला जागतिक आरोग्य संघटना अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन (World Health Organisation) ने 'जागतिक आरोग्य संकट' म्हणून घोषित केले आहे. कोरोना व्हायरसचा परिणाम सिनेसृष्टीवरही झाला असून त्यामुळे अनेक पुरस्कार सोहळे, शूटिंग्स, इव्हेंट्स रद्द करण्यात आले आहेत. जगभरातील कोरोना व्हायरसची गंभीर परिस्थिती पाहता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन नागरिकांमध्ये याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी एक उपक्रम सुरु केला आहे. 'सेफ हँण्डस' (Safe Hands) चॅलेंज असे या उपक्रमाचे नाव असून यात तुमचे हात स्वच्छ कसे धुवाल याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड करायाचा आहे. हातांच्या स्वच्छतेमुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यास नक्कीच मदत होईल. त्यामुळे WHO या संघटनेने अशाप्रकारचे चॅलेंज दिले आहे. Coronavirus बाबत जनजागृती करण्यासाठी अमिताभ बच्चन यांंची खास भोजपुरी कविता (Watch Video)

कोरोना व्हायरस बद्दलची जागरुकता सर्व नागरिकांपर्यंत पोहचावी म्हणून WHO डायरेक्टर डॉक्टर टेड्रोस यांनी अनेक सेलिब्रेंटीना हे चॅलेंज स्विकारण्यास सांगितले आहे. हे चॅलेंज स्विकारण्यासाठी त्यांनी जगभरातील अनेक सेलिब्रेटींसह प्रियंका चोप्रा आणि दीपिका पदुकोण यांना आवाहन केले आहे. या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी दीपिका-प्रियंका यांना टॅग केले आहे. तसंच #SafeHands चॅलेंज स्विकारुन त्यांनी व्हिडिओ शेअर करावा आणि अजून 3 जणांना यासाठी नॉमिनेट करावे. तसंच आपण एकत्रितपणे #COVID19 यावर मात करु शकतो, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत जगभरात 150,000 हून अधिक लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली असून त्यात 5600 लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. देशात कोरोना व्हायरसची संख्या 100 च्या वर गेली असून राज्यात कोरोगाग्रस्तांची संख्या 33 इतकी आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी शासन प्रयत्नशील असून 31 मार्चपर्यंत मुंबईत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर शाळा, कॉलेज, जीम, स्विमिंग पूल, सिनेमा-नाट्यगृह, मॉल्स बंद ठेवण्यात आले आहेत.