दाक्षिणात्य अभिनेता Thalapathy Vijay ने आपल्या आई-वडिलांच्या विरोधात दाखल केली तक्रार; जाणून घ्या काय आहे कारण
Thalapathy Vijay (Photo Credits: Twitter)

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता थलपति विजय (Thalapathy Vijay) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अभिनेत्याने त्याच्या पालकांसह 11 लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, विजयने म्हटले आहे की कोणीही त्याच्या नावाचा वापर करून लोकांना एकत्र जमवू शकत नाही किंवा मिटिंग घेऊ शकत नाही. तमिळ सुपरस्टार विजयने त्याचे नाव राजकीय हेतूंसाठी वापरल्याबद्दल त्याचे पालक एस चंद्रशेखर आणि शोभा शेखर यांच्यासह 11 जणांविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालय 27 सप्टेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी करण्याची शक्यता आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, ही बाब तेव्हा उघडकीस आली जेव्हा विजयचे वडील एसके चंद्रशेखर यांनी 2020 मध्ये विजयच्या नावाने ऑल इंडिया थलपति विजय मक्कल इयक्कम (All India Thalapathy Vijay Makkal Iyakkam) या राजकीय पक्षाची घोषणा केली. तसेच, अभिनेत्याच्या वडिलांनी दावा केला की विजय लवकरच राजकारणात प्रवेश करेल. आता विजयने वडिलांचा हा दावा खोटा असल्याचे सांगितले आहे. यासह त्याच्याकडून एक निवेदनही जारी करण्यात आले आहे, ज्यामध्ये म्हटले आहे- त्याच्या वडिलांनी कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे स्थापन केलेल्या राजकीय पक्षाशी त्याचा काहीही संबंध नाही.

विजयने पुढे म्हटले आहे, ‘मी माझ्या चाहत्यांना विनंती करतो की माझ्या वडिलांनी सुरू केलेल्या पार्टीत सामील होऊ नका. जर कोणी स्वतःच्या राजकीय आकांक्षांसाठी माझ्या नावाचा, फोटोचा किंवा माझ्या फॅन क्लबचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केला तर मी त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई करेन.’ विजयचे हे निवेदन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विजय हा दक्षिण चित्रपटातील त्या अभिनेत्यांपैकी एक आहे ज्यांचे फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे. (हेही वाचा: Kangana Ranaut ने Javed Akhtar विरुद्ध दाखल केली Counter Complaint; केले 'हे' आरोप)

या वर्षी जानेवारीमध्ये, मद्रास उच्च न्यायालयात विजयच्या वकिलाने सांगितले की विजयच्या वडिलांनी त्याच्या संमतीशिवाय ऑल इंडिया थलपति विजय मक्कल इयक्कम नावाच्या राजकीय पक्षाची नोंदणी केली आहे. आता विजयने याला विरोध केला आहे.