
अथिया शेट्टी आणि केएल राहुलच्या लग्नानंतर आता सगळ्यांच्या नजरा आणखी एका मोठ्या सेलेब्रिटी भारतीय लग्नाकडे लागल्या आहेत. सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) यांचा विवाह होऊ घातला आहे. सिद्धार्थ आणि कियारा यांनी त्यांच्या लग्नाच्या बातमीवर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही, परंतु सूत्रांच्या माहितीनुसार, या लग्नाची तयारी जोरात सुरू झाली आहे. असे सांगितले जात आहे की सिद्धार्थ आणि कियारा 6 फेब्रुवारीला लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. या लग्नाचे सर्व फंक्शन्स 5 फेब्रुवारीपासून सुरू होतील आणि 8 फेब्रुवारीपर्यंत चालतील.
'आज तक'च्या वृत्तानुसार, सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये सप्तपदी चालतील. लग्नासाठी 100 ते 125 पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. पाहुण्यांच्या या यादीत बॉलिवूडपासून ते इतर अनेक क्षेत्रातील सेलिब्रिटींच्या नावांचा समावेश आहे. यामध्ये अमिताभ बच्चनपासून शाहरुख खान, करण जोहर आणि वरुण धवनपर्यंत अनेक सेलिब्रिटींच्या नावांचा समावेश आहे.
वृत्तानुसार, सूर्यगढ पॅलेसमधील अनेक लक्झरी व्हिला पाहुण्यांसाठी बुक करण्यात आले आहेत. सुमारे 84 खोल्यांमध्ये पाहुणे राहणार आहेत. पाहुण्यांची ने-आण करण्यासाठी 70 हून अधिक आलिशान वाहने बुक करण्यात आली आहेत. या पॅलेसमधील लग्नासाठी दररोजचे भाडे 1 ते 2 कोटी रुपयांच्या जवळपास आहे. लग्नाच्या तयारीची जबाबदारी मुंबईतील एका मोठ्या वेडिंग प्लॅनर कंपनीला देण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. 4 फेब्रुवारीपासून सूर्यगढ पॅलेसमध्ये पाहुणे पोहोचण्यास सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (हेही वाचा: देसी गर्ल ने पहिल्यांदाच दाखवली लेक Malti Marie ची झलक; तिच्या क्युटनेसवर सोशल मीडीया फिदा)
सिद्धार्थ आणि कियारा यांचा हळदी आणि संगीत समारंभही लग्नाच्या दिवशीच होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, लग्न आणि इतर विधींबद्दल अधिकृतपणे काहीही दुजोरा मिळालेला नाही. सूर्यगड पॅलेसमध्ये हळद, संगीत आणि मेहंदी विधींसाठी सेट डिझाइन करण्याचे काम सुरू झाले आहे. याआधी कियारा अडवाणी डिझायनर मनीष मल्होत्रासोबत दिल्लीला जाताना दिसली होती. त्यावरून ती लग्नाच्या कपड्यांच्या फिटिंगसाठी जात असल्याचा अंदाज बांधला जात होता. सिद्धार्थ मल्होत्रा आधीच दिल्लीत पोहोचला आहे. सिद्धार्थ आणि कियारा पंजाबी रितीरिवाजांनुसार लग्न करणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, जैसलमेरमध्ये लग्न झाल्यानंतर हे जोडपे मुंबईत ग्रॅंड वेडिंग रिसेप्शन ठेवणार आहेत. तसेच सिद्धार्थ आणि कियाराच्या कुटुंबीयांनी या भव्य लग्नाला डॉक्युमेंटरी शोमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.