Shatrughan Sinha व कुटुंबीय ED च्या रडारवर; पुण्यातील गृहस्थांची तक्रार, कोट्यावधी रुपयांची जमीन लाटली
शत्रुघ्न सिन्हा (Photo Credits: IANS)

संदीप दाभाडे नावाच्या व्यक्तीने बॉलीवूड चित्रपट स्टार शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha), त्यांची पत्नी पूनम सिन्हा आणि मुलगा कुश सिन्हा यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाकडे (ED) तक्रार केली आहे. पुण्यातील वाघोली परिसरातील रहिवासी संदीप दाभाडे यांनी दिलेल्या लेखी तक्रारीनुसार, हे प्रकरण एक हेक्टर जमिनीशी संबंधित असून,  ही जमीन चुकीच्या पद्धतीने स्वतःची दर्शवल्याचा आरोप शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या कुटुंबीयांवर केला आहे. या प्रकरणी चौकशीसाठी संदीप यांनी अर्ज केला आहे.

हे प्रकरण 2002 सालचे आहे. या प्रकरणात, ईडी मुख्यालयातील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या तक्रारीचा तपास ईडीच्या तपास पथकाकडून केला जाईल. हे खरोखरच मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत म्हणजेच पीएमएलए अंतर्गत प्रकरण आहे की नाही, हे पहिले जाईल. त्यानंतर हा खटला त्या कायद्यांतर्गत आला तरच या प्रकरणाचा ताबा घेतला जाईल, अन्यथा तो गुन्हा ईडीकडून नोंदवला जाणार नाही.

तपास यंत्रणेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण सध्या स्थानिक पोलीस ठाण्याशी संबंधित आहे. पोलीस आणि ईडीला दिलेल्या तक्रारीत तक्रारदार संदीप दाभाडे यांनी नमूद केले आहे की, त्यांच्या मृत वडिलांच्या नावावरील कोट्यवधी रुपयांची सुमारे एक हेक्टर जमीन, शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी स्वतःची असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सिन्हा कुटुंब ती जमीन विकण्याचाही प्रयत्न करत होते. ही मालमत्ता संदीपचे वडील गोरख दाभाडे यांच्या नावावर होती, जी त्यांना 2002 मध्ये आपल्याला देण्यात आली, असे सिन्हा कुटुंबीय सांगत आहेत. (हेही वाचा: Pornography Case प्रकरणी राज कुंद्राने सोडले मौन, विधान जाहीर करत म्हटली 'ही' गोष्ट)

2007 मध्ये संदीपच्या वडिलांचे निधन झाले. या मालमत्तेवर फक्त आपलाच हक्क आहे असे संदीपचे म्हणणे आहे. त्यामुळे हे प्रकरण स्थानिक न्यायालय व आता तपास यंत्रणेच्या दारात पोहोचले आहे, परंतु प्राथमिक माहितीच्या आधारे हे प्रकरण ईडीचे नाही असे दिसते. सध्या तरी फिल्मस्टार शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून याप्रकरणी कोणतेही औपचारिक वक्तव्य किंवा निवेदन समोर आले नाही.