Pregnancy Bible: करीना कपूरचे 'प्रेग्नन्सी बायबल’ पुस्तक वादाच्या भोवऱ्यात; Beed मध्ये धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार दाखल
Kareena Kapoor Khan Holding Her Book ‘Pregnancy Bible’ (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खानने (Kareena Kapoor) नुकतेच तिचे पुस्तक लॉन्च केले आहे. करीनाच्या गरोदरपणाच्या प्रवासावर आधारित हे पुस्तक आहे. हे पुस्तक आपले तिसरे मुल असल्याचे करीनाने म्हटले होते. मात्र आता या पुस्तकामुळे करीना कपूरच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. बीड (Beed) येथे ख्रिश्चन समुदायाने धार्मिक भावना दुखावल्याबद्दल करीनाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार करीना कपूरच्या पुस्तकाच्या शीर्षकाविषयी दाखल केली आहे. करीना कपूरच्या या पुस्तकाचे नाव ‘प्रेग्नन्सी बायबल’ (Pregnancy Bible) असे आहे.

या शीर्षकाबद्दल महाराष्ट्रातील ख्रिश्चन समाजाने प्रश्न उपस्थित केले आहेत. पीटीआयच्या अहवालानुसार करीनाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. ख्रिश्चन फेडरेशनच्या अध्यक्षांनी करीना कपूर आणि अन्य दोघांविरूद्ध शिवाजी नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत अभिनेत्रीवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे की, करीना कपूरने पुस्तकाच्या शीर्षकात ख्रिश्चन धर्मियांचे पवित्र पुस्तक, बायबलचे नाव वापरले आहे. यामुळे समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. या तक्रारीसंदर्भात करिनाच्या बाजूने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

एका पोलिस अधिकाऱ्याने तक्रार मिळाल्याची पुष्टी केली आहे, परंतु अद्याप कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही, असे त्यांनी सांगितले. शिवाजी नगर पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी सांगितले की, आम्हाला तक्रार मिळाली आहे परंतु ही घटना येथे (बीडमध्ये) घडली नसल्यामुळे येथे कोणताही गुन्हा दाखल होऊ शकत नाही. तक्रारकर्त्यांना मुंबईत तक्रार दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (हेही वाचा: Dia Mirza ने दिला गोंडस मुलाला जन्म, दोन महीने आधीच झाली आई)

दरम्यान, करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी फेब्रुवारीमध्ये त्यांच्या दुसर्‍या मुलाला जन्म दिला. तैमूरच्या धाकट्या भावाचे नाव जेह असे ठेवण्यात आले आहे. सोशल मीडियावर करिना कपूरने सांगितले होते की, ती गरोदरपणातील प्रवासाविषयी एक पुस्तक लिहित आहे, ज्याचे नाव ‘प्रेग्नन्सी बायबल’ असे नाव ठेवले आहे. हे पुस्तक गेल्या आठवड्यातच सादर केले गेले.