Saaho Film Poster (Photo Credits: Twitter)

यंदा 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर 3 मोठे सिनेमे एकमेकांना टक्कर देणार होते. अक्षय कुमार (Akshay Kumar) चा 'मिशन मंगल', जॉन अब्राहम (John Abraham) चा 'बाटला हाऊस' आणि प्रभास (Prabhas) चा 'साहो' हे तीन सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित होणार होते. मात्र आता ही टक्कर टाळण्याच्या प्रयत्नात असलेल्या 'साहो' सिनेमाच्या निर्मात्यांनी रिलीज डेट बदललली आहे. त्यामुळे प्रभासच्या चाहत्यांना अजून काही वेळ सिनेमाची प्रतिक्षा करावी लागणार आहे. आता 'साहो' हा सिनेमा 15 ऑगस्ट ऐवजी 30 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (साहो चित्रपटाचे पहिले गाणे 'सायको सैयां' आले प्रेक्षकांच्या भेटीला)

सिनेमाच्या निर्मात्यांनी ऑफिशिअल ट्विटद्वारे याची माहिती दिली आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, "बाहुबलीच्या प्रभासची वाट सर्वजण पाहत आहेत. मात्र निर्माते प्रेक्षकांना चांगला अनुभव देऊ इच्छित आहेत. त्यामुळे सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. आता हा सिनेमा 30 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होईल." पहा सिनेमाचा टीझर

UV Creations ट्विट :

'मिशन मंगल' आणि 'बाटला हाऊस' या दोन सिनेमांमुळे बिग बजेट सिनेमा 'साहो' वर परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर त्याच दिवशी साऊथचे दोन मोठे सिनेमेही प्रदर्शित होत आहेत. या सगळ्याचा परिणाम सिनेमावर होऊन निर्मात्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून रिलीज डेट बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

'साहो' सिनेमात श्रद्धा कपूर, नील नितिन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर आणि चंकी पांडे यांसारख्या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. सुजीत याने या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून वामसी, प्रमोद आणि विक्रम यांनी एकत्रितपणे निर्मितीची सुत्रं सांभाळली आहेत. 'साहो' सिनेमा हिंदी, तमिळ आणि तेलुगू या तीन भाषेत प्रदर्शित करण्यात येईल.