PM Narendra Modi Garbo Song

उद्यापासून शारदीय नवरात्रीला (Navratri 2023) सुरुवात होत आहे. अशा स्थितीत सर्वत्र या उत्सवाची धामधूमप पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची तयारी सुरू आहे, तर काही ठिकाणी गरबा-दांडियासाठी मैदाने सज्ज होत आहे. उद्यापासून पुढील नऊ दिवस ठिकठिकाणी गरबा खेळला जाणार आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गरब्यावर खास गाणे लिहिले आहे. हे गाणे चित्रपट निर्माता जॅकी भगनानी यांच्या डायनॅमिक म्युझिक लेबल जस्ट म्युझिकने रिलीज केले आहे.

हे गाणे आज यूट्यूबवर रिलीज करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कवितेपासून प्रेरणा घेऊन जस्ट म्युझिकने त्याची रचना केली आहे. या गाण्याचे शीर्षक ‘गरबो’ असे आहे. हा व्हिडिओ अतिशय सुंदर आणि आकर्षक पद्धतीने शूट करण्यात आला आहे.

हे गाणे तनिष्क बागचीने संगीतबद्ध केले असून ध्वनी भानुशालीने गायले आहे. गरबाच्या म्युझिक व्हिडिओचे दिग्दर्शन नदीम शाह यांनी केले आहे. गरबो गाण्याचे विमोचन करताना जॅकी भगनानीनी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत या संगीत प्रकल्पाचा भाग असणे हा माझ्यासाठी आणि जस्ट म्युझिकसाठी खूप अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. (हेही वाचा: Navratri 2023: कोलकाता नवरात्रीनिमित्त दूर्गादेवी पूजेसाठी हटके संकल्पना, मासीक पाळी विषयाबाबत जनजागृती)

जॅकी पुढे म्हणाले. ‘गरबोमध्ये आपला सांस्कृतिक वारसा आणि नवरात्रीची अनुभूती पाहायला मिळते. या गाण्यातून तुम्हाला आमच्या संगीताची ताकदही कळते.’ आगामी अनेक वर्षे नवरात्रीच्या उत्सवात लोक गरबा गाण्याच्या तालावर नाचतील असा विश्वास जॅकी यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाण्याचा व्हिडीओ अशा प्रकारे तयार करून रिलीज करण्याची ही पहिलीच वेळ आहे.पंतप्रधानांनी लिहिलेले हे गाणे नवरात्रीच्या उत्सवाविषयी भाष्य करते, जे विविध राज्यांतील लोकांना संस्कृती आणि परंपरा स्वीकारून एकत्र आणते.