कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर देशात 30 जून पर्यंत लॉकडाऊन (Lockdown) पाळण्यात येत आहे. आतापर्यंत पाच वेळा लॉकडाऊनचा काळावधी वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे विविध राज्यात अनेक मजूर अडकले आहेत. या मजूरांना त्यांच्या घरी पोहचवण्याचं काम बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने केलं आहे. जोपर्यंत सर्व मजूर आपल्या घरी पोहोचत नाहीत तोपर्यंत मदत चालू राहिलं अशी भूमिका सोनूने घेतली आहे. त्याच्या या सामाजिक कार्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. सोनूच्या या कार्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार देखील भारावून गेले आहेत. रोहित पवार यांनी गुरुवारी सोनू सूद यांची सदिच्छा भेट घेतली.
रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून सोनू सूद यांच्या सदिच्छा भेटीदरम्यानचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी ‘घर जाना हैं’ हे स्थलांतरित मजुरांचे केवळ तीन शब्द ऐकून हजारो मजुरांना स्वगृही सुखरुप पोचवणाऱ्या सोनू सूद यांची त्यांच्या घरी भेट घेतली” अशी कॅप्शन दिली आहे. (वाचा - जान्हवी कपूर, खुशी कपूर आणि बोनी कपूर यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह; 3 कर्मचारीही झाले कोरोनामुक्त)
'घर जाना हैं', हे स्थलांतरित मजुरांचे केवळ तीन शब्द ऐकून हजारो मजुरांना स्वगृही सुखरुप पोचवणाऱ्या @SonuSood यांची आज त्यांच्या घरी भेट घेतली.
Met #SonuSood today, the man who has been answering the calls of thousands of #migrants who wanted to go home & helping them out. pic.twitter.com/xllGrI3RPN
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 4, 2020
दरम्यान, सोनू सूद यांनी रोहित पवार यांचे ट्विट रिट्विट केलं आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, 'तुम्हाला भेटून आनंद झाला. चांगले काम चालू ठेवा. आम्हा सर्वांना तुमचा अभिमान वाटतो. प्रत्येक स्थलांतरितासाठी उपलब्ध राहण्याचा मी प्रयत्न करत आहे. शेवटची स्थलांतरित व्यक्ती घरी पोहचेपर्यंत मी मदत करीत राहिल,' असं सोनू सूदने म्हटलं आहे.
सोनू सूदने आतापर्यंत हजारो स्थलांतरित मजूरांना घरी पाठवलं आहे. तसेच त्यांनी मजूरांच्या जेवणाचीदेखील व्यवस्था केली आहे. जोपर्यंत शेवटचा मजूर घरी पोहोचत नाही तोपर्यंत मदत करत राहणार, अशी ठाम भूमिका सोनू सूदने घेतली आहे. बॉलिवूडमधील अनेक कलांकारांनी कोरोना विरोधातील लढाईसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. या सर्व कलाकारांचं चाहत्यांकडून कौतुक होतं आहे.