Salman Khan | (Photo Credits: Twitter)

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या हिट-अँड-रन (Hit-And-Run) प्रकरणावर आधारीत 'सेलमोन भोई' (Selmon Bhoi) गेमवर मुंबई कोर्टाने (Mumbai Court) तात्पुरती बंदी घातली आहे. न्यायाधीश के. एम. जसवाल यांनी यासंबंधित आदेश दिले आहेत. हा गेम बनवणाऱ्या Parody Studios Pvt Ltd आणि त्याचे डिरेक्टर यांना गेमचे लॉन्चिग, रि-लॉन्चिंग आणि रि-क्रिएटींग करण्यापासून कोर्टाने रोखले आहे. (Selmon Bhoi Game: सलमान खान याच्या हिट अँड रन प्रकरणावर बनला गेम, Play Store वरही व्हायरल, 4.7 रेटींग)

तसंच गुगल प्ले स्टोअर आणि इतर माध्यमांवर उपलब्ध असलेला हा गेम तात्काळ ब्लॉक करण्याचे आदेश कोर्टाने निर्मात्यांना दिले आहेत. हा गेम आणि त्यातील चित्र पाहिल्यानंतर त्यातील पात्र प्रथमदर्शनी सलमान खान सारखं वाटत असून हा गेम सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणाशी संबंधित असल्याचे भासते, असे कोर्टाने सांगितले आहे.

या गेमला सलमान खानने संमती दिलेली नाही. त्यामुळे सलमानची संमती नसताना त्याच्या सारखा भासणारा चेहरा डिझाईन करुन त्याच्याविरुद्ध झालेल्या प्रकरणावर गेम तयार करणे म्हणजे त्याची प्रायव्हसी हिरावून घेतल्यासारखे असून आहे. तसंच यामुळे त्याची प्रतिमा देखील डागाळली जात आहे, असे कोर्टाने म्हटले आहे.

गेमच्या निर्मात्यांनी सलमान खान यांच्या प्रसिद्धीचा फायदा घेत गेमचे प्रमोशन केल्याचेही कोर्टाने म्हटले आहे. या गेमच्या निर्मात्यांविरुद्ध सलमान खानने गेल्या महिन्यात कोर्टात अर्ज दाखल केला होता. या गेममधील पात्र आणि नावं सलमान खानशी मिळते जुळते असल्याचे या अर्जात लिहिले होते. या गेममध्ये सलमान खानच्या नावाऐवजी Selmon Bhoi असे नाव वापरण्यात आले होते.

सलमान खानची परवानगी न घेता त्याच्या नावाचा गैरवापर करुन गेमच्या निर्मात्यांनी गेमचे प्रमोशन केले, अशी माहिती सलमान खानची law firm DSK Legal यांनी दिली आहे. सलमान खानच्या या अर्जाविरुद्ध गेम निर्मात्यांनी आपले affidavit  सादर करावे असे कोर्टाने सांगितले असून या प्रकरणाची पुढील सुनावणी 20 सप्टेंबर रोजी होणार आहे. दरम्यान, 2002 मध्ये सलमान खान विरुद्ध हिट-अँड-रन चा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी बॉम्बे हायकोर्टाने 2015 मध्ये त्याला निर्दोष मुक्त केले.