PVR Pictures Logo (Photo Credits: Twitter)

कोरोना विषाणू (Coronavirus) च्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊन (Lockdown) मुळे सध्या सर्व उद्योग ठप्प झाले आहेत. यामध्ये चित्रपटसृष्टीलाही संकटाचा सामना करावा लागत आहे. सर्व चित्रपटांचे शूटिंग थांबले आहे, परिणामी चित्रपटांच्या रिलीज डेटही बदलण्यात आल्या आहेत. सध्या अनेक चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत, मात्र बहुतेक निर्मात्यांनी चित्रपटांना फक्त डिजिटल प्लॅटफॉर्मवरच (Digital Platforms) रिलीज करण्यास सुरवात केली आहे. निर्मात्यांच्या या निर्णयाबाबत आधी आयनॉक्स (INOX) व आता  पीव्हीआर पिक्चर्सने (PVR Pictures) आपली नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वी बॉलिवूडचे दोन मोठे चित्रपट, ‘गुलाबो सिताबो' आणि विद्या बालनचा 'शकुंतला देवी', अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार असल्याचे जाहीर केले होते. तेव्हापासून, मल्टीप्लेक्सच्या मालकांनी या बदलाबाबत चिंता व्यक्त केली आहे.

सुरुवातीपासूनच बॉलिवूड चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचा ट्रेंड आहे. परंतु कोरोना विषाणूमुळे देशभरात लॉकडाऊन आहे व सर्व थिएटर्स बंद आहेत अशा परिस्थितीत चित्रपट निर्माते त्यांच्या चित्रपटांचे नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मकडे वळले आहेत. आता याच मुद्द्यावर पीव्हीआर सिनेमाने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनाद्वारे त्यांनी चित्रपट निर्मात्यांना विनंती केली आहे की, थिएटर सुरू होईपर्यंत त्यांनी त्यांचे चित्रपट प्रदर्शित करू नये. (हेही वाचा: Paatal Lok Full Series in HD Leaked: अनुष्का शर्माची वेब सीरिज 'पाताल लोक' झाली लीक?)

यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, 'चित्रपट निर्मात्याची मेहनत प्रेक्षकांना दाखविण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्यांना चित्रपटगृहात दाखवणे. हे केवळ भारतातच नव्हे तर जगभर अनेक दशकांपासून घडत आहे. मात्र कोविड-19 मुळे थिएटर बंद झाली आहेत. परंतु आमचा विश्वास आहे की, जेव्हा सर्व काही ठीक होईल, तेव्हा सिनेमाप्रेमी लोकांना नक्कीच थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पहाण्याची इच्छा असेल.'

पीव्हीआरपूर्वी आयनॉक्सनेही थेट ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करण्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आयनॉक्सने एका निवेदनात म्हटले आहे की, या कठीण काळात आपल्याला एकमेकांसोबत चालणे आवश्यक आहे.’