ईशान खट्टर (Ishaan Khatter) आणि अनन्या पांडे (Ananya Panday) यांचा ‘खाली पीली’ (Khaali Peeli) हा चित्रपट अखेर ओटीटी पलॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे, 2 ऑक्टोबरला हा चित्रपट झी प्लेक्स (Zee Plex) प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल. मात्र दर्शकांना ‘खाली पीली’ पाहण्यासाठी अतिरिक्त रक्कम खर्च करावी लागणार आहे, कारण झिप्लेक्स येथे ‘पे पर व्ह्यू’ (Pay-Per-View Service) या योजनेअंतर्गत हा चित्रपट उपलब्ध होईल. याअंतर्गत तुम्हाला हा चित्रपट पाहण्यासाठी प्रत्येक वेळी वेगळी किंमत मोजावी लागेल. चित्रपटगृहातील तिकीट परंपरेवर ही संकल्पना आधारित आहे.
ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे चित्रपट निर्मात्यांचे मोठे नुकसान होत आहे. बरेच ओटीटी प्लॅटफॉर्म सबस्क्रायबर वर आधारित आहेत. अशा परिस्थितीत एखादा चित्रपट त्या विशिष्ट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्याने, त्याचे ग्राहक तो विनामूल्य पाहू शकतात. त्यांना केवळ त्यांचे एक-वेळ सदस्यता शुल्क द्यावे लागते. आता ‘पे पर व्ह्यू’ सिस्टम अंतर्गत, चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतील, परंतु आपण त्या प्लॅटफॉर्मची सदस्यता घेतली आहे की नाही त्याने काही फरक पडणार नाही. तो चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील.
(हेही वाचा: Khaali Peeli Teaser: अनन्या पांडे, ईशान खट्टर च्या 'खाली पिली' सिनेमाचा टीझर प्रदर्शित! (Watch Video)
याबाबत एका हिंदी वेब पोर्टलशी बोलताना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शरिक पटेल म्हणाले की, किंमतीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, लवकरच याबाबत किंमत सांगितली जाईल. हा चित्रपट टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर पहिला जाऊ शकतो. यासाठी झी समूहाने केबल सेवा देणाऱ्या कंपनीशी करार केला आहे. कोरोना विषाणूमुळे सध्या अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. मात्र त्यामुळे चित्रपटाचे यश व त्यातून मिळणारे मिळकत यान ची सांगड बसवणे अवघड ठरत आहे. म्हणूनच आता निर्माते ‘पे पर व्ह्यू’ सिस्टमचा विचार करत आहेत. आता ही प्रणाली किती यशस्वी होईल हे येणारा काळच सांगेल.