India Fights With COVID: रुग्णालये आणि ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी अभिनेता Sonu Sood ने उचलले महत्वाचे पाऊल; लाँच केला नवीन प्लॅटफॉर्म
Sonu Sood (Photo Credits: Twitter)

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) प्रत्येकवेळीच गरजू लोकांना मदत करण्यामुळे चर्चेत असतो. गेल्या एका वर्षात सोनू सूदने लोकांची अनेकप्रकारे मदत केली आहे. आता पुन्हा एकदा कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) देशात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रुग्णालयांमध्ये बेड, औषधे आणि ऑक्सिजनची कमतरता भासत असल्याचे दिसून येत आहे. सोनू सूदने अशा समस्या लक्षात घेऊन एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. सोनू सूदने ‘इंडिया फाइट्स विथ कोविड’ (India Fights With COVID) नावाचे एक टेलिग्राम अॅप लाँच केले आहे. ज्याद्वारे तो देशातील गरजू लोकांना रुग्णालयात बेड, औषधे आणि ऑक्सिजन मिळवून देण्यात मदत करू शकेल.

याबाबत सोनू सूदने ट्वीट करत माहिती दिली आहे. तो म्हणतो, 'आता संपूर्ण देश एकत्र येईल. इंडिया फाइट्स विथ कोविड या टेलिग्राम चॅनेलवर माझ्याबरोबर हातमिळवणी करा. देश वाचवा.' आपल्या ट्विटमध्ये सोनू सूदने लोकांना कोविड फोर्समध्ये सामील होण्याचे आवाहनही केले आहे. गेल्या काही दिवसांपासून बरेच लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून सोनू सूदकडे मदतीची याचना करीत होते, ते पाहून अभिनेत्याने टेलीग्रामच्या सहकार्याने एक चॅनेल सुरू केले. (हेही वाचा: Gautam Gambhir च्या संस्थेला Akshay Kumar ने केली मोठी मदत; कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी दिले 1 कोटी रुपये)

सध्या सोनू सूद लोकांना त्यांचे शिक्षण, उपचार, काम, नोकरी अशा प्रत्येक गोष्टीत मदत करताना दिसत आहे. सोनू सूदच्या या मदत कार्यामुळे काही ठिकाणी त्याची मूर्ती उभी केली आहे, तर काही ठिकाणी त्याची पूजा होत आहे. त्याने आपल्या कामाद्वारे अनेकांची मने जिंकली आहेत. लॉकडाऊन दरम्यानही सोनू सूदने लोकांना खूप मदत केली, इतकेच नाही तर त्याने परदेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांनाही विमानामार्फत भारतात आणले. काही दिवसांपूर्वी सोनू सूदलाही कोरोना विषाणूची लागण झाली होती. त्यानंतर त्यावर मात करत आता तो पुन्हा लोकांच्या मदतीसाठी उभा राहिला आहे.