अभिनेता Aamir Khan विरोधात हिंदू संघटनेचे आंदोलन; Laal Singh Chaddha चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी
Laal Singh Chaddha (Photo Credit - Twitter)

आमिर खानचा (Aamir Khan) 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. हा चित्रपट बॉयकॉट करण्याची मागणीही सोशल मिडीयावर जोर धरत होती. अशात आता हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. मात्र या चित्रपटाबाबत लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. वाराणसीतील 'सनातन रक्षक सेने'च्या सदस्यांनी गुरुवारी वाराणसीतील विजया मॉलमध्ये आमिर खान आणि करीना कपूर खान यांच्या 'लाल सिंग चड्ढा' चित्रपटाला विरोध केला. हा विरोध आणखी तीव्र होऊ शकतो असे दिसते.

आमिर खान आणि त्याची पूर्व पत्नी यांना आपल्या देशात सुरक्षित वाटत नाही, तेव्हा त्यांनी आपला चित्रपट भारताबाहेर अशा ठिकाणी प्रदर्शित करावा जिथे त्यांना सुरक्षित वाटते, असे म्हणत रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी आंदोलकांनी केली. सनातन रक्षक सेनेच्या मंडळाच्या अध्यक्षा रीता बजाज म्हणाल्या की, त्यांना लाल सिंग चड्ढा चित्रपटाबाबत समस्या नाही, तर समस्या आहे ती आमीर खान बाबत.

यादरम्यान विरोधकांनी आमिर खानचा पुतळा जाळण्याचाही प्रयत्न केला मात्र प्रशासनाने त्यांना तसे करू दिले नाही. निदर्शनानंतर त्यांनी भेलुपूरचे स्टेशन प्रभारी यांना हा चित्रपटावर बंदी घालण्याबाबतचे निवेदन दिले. आमिर खानला जोपर्यंत अभिनेता मानने बंद होत नाही, तोपर्यंत असा विरोध चालू राहील असेही संघटनेने सांगितले. (हेही वाचा: 'Laal Singh Chaddha' तामिळरॉकर्सवर झाला लीक, नेटकरी अवैध लिंक्सद्वारे विनामूल्य करत आहेत डाउनलोड)

सनातन रक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष चंद्र प्रकाश सिंह यांनी सांगितले की, आमिरचा याआधीचा 'पीके' चित्रपट पाहिल्यानंतर दिसून येते की, आमिर खान हिंदू देव-देवतांची खिल्ली उडवत आहे आणि त्यांच्यावर टीका-टिप्पणी करत आहे. आता लोकांनी त्याचा 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट पाहू नये आणि त्यात आपला वेळ आणि पैसा वाया घालवू नये, असे आवाहन संस्थेने केले आहे. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी संघटनेने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली आहे.

या चित्रपटात आमिर खानसोबत करीना कपूर खान दिसत आहे. या दोघांशिवाय या चित्रपटात नागा चैतन्य आणि मोना सिंह देखील दिसले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले आहे. प्रीतमने चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. आमिर खानचा हा चित्रपट हॉलिवूड चित्रपट 'फॉरेस्ट गंप'चा अधिकृत हिंदी रिमेक आहे.