गायक मीका सिंह याच्यासह 14 जणांवर FWICE कडून बंदी; पाकिस्तानमध्ये परफॉर्मन्स दिल्याने कारवाई
Mika Singh (Photo Credits: Twitter)

भारताने कलम 370 हटवल्यानंतर चिडलेल्या पाकिस्तानने भारतासोबतचे जवळजवळ सर्व संबंध तोडून टाकले आहेत. दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण असताना गायक मीका सिंह (Mika Singh) याने पाकिस्तानमधील कराची शहरात परफॉर्म केले. मीकाच्या या कृत्यामुळे अनेक भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) ने मीका सिंह आणि त्या शोमध्ये त्याच्याबत असलेल्या त्याच्या 14 कृ मेम्बर्सवर बंदी घातली आहे.

याबाबत बोलताना FWICE ने सांगितले, ‘आम्हाला अशा कृत्यांबद्दल शून्य सहिष्णुता आहे आणि या सर्व लोकांचे हे देशविरोधी कृत्य म्हणून आम्ही एकमताने याचा निषेध करतो’. अशा प्रकारे मीका सिंहसह या 14 जणांच्या भारतातील रेकॉर्डिंग, प्लेबॅक, गायन आणि अभिनय अशा सर्व गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. ऑल इंडिया सिनेमा वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता म्हणाले, ‘ऑल इंडिया सिनेमा वर्कर्स असोसिएशन (एआयसीडब्ल्यूए) या गोष्टीची काळजी घेईल की, इंडस्ट्री मधील कोणीही मीका सिंहसोबत काम करणार नाही. जर कोणी असे केले तर त्यांच्याविरूद्धही कायदेशीर कारवाई केली जाईल.’

 जाणून घ्या काय आहे प्रकरण –

सध्या भारताच्या अनेक गोष्टींवर घातलेल्या बंदीनंतर पाकिस्तानने भारतीय कलाकारांवरही बंदी घातली आहे. मात्र काही दिवसांपूर्वी मीका सिंहचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये मीका सिंह कराची येथे परफॉर्मन्स देताना दिसून आला होता.  जनरल मुशर्रफच्या (Pervez Musharraf) नातेवाईकाच्या लग्नासारख्या एका विशेष कार्यक्रमात मीकाने परफॉर्मन्स दिला होता. या घटनेचे पडसाद भारत आणि पाकिस्तान अशा दोन्ही देशांमध्ये उमटले.

‘काश्मीर अजूनही बंद आहे, अशा परिस्थितीत एक भारतीय गायक इथे येतो, परफॉर्मन्स देतो, पैसे कमावतो आणि निघून जातो. असे वागतो जाणून काही घडलेच नाही. यावरून लक्षात येते की, धर्म आणि देशप्रेम हे  केवळ गरिबांसाठी आहे’ अशा प्रकारे ट्विट करत पाकिस्तानी नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पाकिस्तानी सरकारने या काळात एकूण 14 लोकांचा व्हिसा मंजूर केला होता. यामध्ये मीका सिंह याचे नाव होते.