Chanda Kochhar (PC - PTI)

आयसीआयसीआय बँकेच्या (ICICI Bank)  माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर (Ex CEO Chanda Kochhar)  यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाच्या प्रदर्शनावर दिल्ली हायकोर्टाने बंदी घातली आहे. चंदा कोचर यांचे वकील विजय अग्रवाल आणि नमन जोशी यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली होती. या चित्रपटाची कथा चंदा कोचर यांच्या आयुष्यावर आधारित आहे. Chanda: A Signature that Ruined a Career, असे या चित्रपटाचे नाव आहे.

सध्या सीबीआय व ईडी चंदा कोचर यांची चौकशी करत आहेत, असं या चित्रपटाच दाखवण्यात आलं होत. त्यामुळे चित्रपटाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. याविषयी चंदा यांचे वकिल विजय अग्रवाल यांनी सांगितले की, 20 नोव्हेंबर 2019 रोजी चंदा कोचर यांना हा चित्रपट त्यांच्या जीवनावर आधारित असल्याचे समजले. या चित्रपटाच्या नावातही चंदा यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. परंतु, या चित्रपटासाठी चंदा कोचर यांची कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आलेली नाही.

हेही वाचा - ICICI बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांच्याविरुद्ध CBI ची लूकआऊट नोटीस जारी

विशेष म्हणजे या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्रीनेही प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना चंदा कोचर यांच्या आयुष्यावर बायोपिक करत असल्याचे सांगितले आहे. या चित्रपटात अभिनेत्री गुरलीन चोप्रा हिने चंदा कोचर यांची भूमिका साकारली आहे. या सर्व बाबींमुळे चंदा यांच्या वकिलाने दिल्ली उच्च न्यायालयाच युक्तीवाद केला आहे. त्यामुळे न्यायालयाने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणली आहे.