Chanda Kochhar (Photo Credits: PTI)

आयसीसीआय बँकेच्या (ICICI Bank) माजी सीईओ चंदा कोचर (Chanda Kochhar) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात व्हिडिओकॉन कर्ज प्रकरणात भष्ट्राचार आणि गैरव्यवहार प्रकरणी त्यांना बडतर्फ करण्यात आले होते. आता चंदा कोचर यांना देश सोडून जाण्यास मनाई करण्यात आली असल्याचे सांगत त्यांच्या विरोधात सीबीआयने (CBI) लूकआऊट नोटीस (Lookout Notice) जारी केली आहे. चंदा कोचर यांनी देश सोडण्याचा प्रयत्न केल्यास आम्हाला तशी माहिती द्यावी, असे सीबीआयने सर्व विमानतळावरील इमिग्रेशन विभागाला आदेश दिले आहेत. चंदा कोचर Videocon प्रकरणात दोषी; संचालक मंडळाने कारवाई करत केले बडतर्फ

चंदा कोचर यांनी पती दीपक कोचर आणि व्हिडिओकॉन कंपनीचे एमडी वेणुगोपाल धूत यांच्यासोबतीने जून 2009 ते ऑक्टोबर 2011 दरम्यान नियमांचे उल्लंघन करत व्हिडिओकॉन ग्रुपच्या कंपन्यांना 1,875 कोटी रुपयांचे 6 लोन मंजूर करुन बँकेसोबत गैरव्यवहार केला आहे. यात व्हिडिओकॉन कंपनीचे दोन युनीट, न्यूपॉवर रेनेवेबल्स आणि सुप्रीम ऊनर्जी या कंपन्यांचा समावेश आहे. या प्रकरणी चंदा कोचर, दीपक कोचर आणि धूत यांच्या सह पाच जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदा कोचर यांच्या विरोधात जारी करण्यात आलेल्या लूकआऊट नोटीस देखील रिव्हाईज करण्यात आली आहे. यापूर्वी आयसीआयसी बँकने या प्रकरणाची तपासणी सुरु केली होती. त्यानंतर सीबीआयने गेल्यावर्षी मार्च-एप्रिल दरम्यान दीपक कोचर आणि धूत यांच्याविरुद्ध लूकआऊट नोटीस जारी केली. त्यावेळेस चंदा कोचर यांच्याविरोधातही लूकआऊट नोटीस जारी झाल्याच्या चर्चेला उधाण आले होते. मात्र नंतर सीबीआय अधिकाऱ्यांनी या वृत्ताचे खंडन केले होते.