आयसीआयसीआय (ICICI) बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर (Chanda Kochhar) यांच्या अडचणीत अजूनच वाढ झाली आहे. व्हिडिओकॉन (Videocon) प्रकरणात बँकेच्या अचारसंहितेचा भंग केल्याचा, तसेच आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप चंदा यांच्यावर ठेवण्यात आला होता, त्यात त्या दोषी आढळत्या आहेत. त्यामुळे आता त्यांना बँकेच्या संचालक मंडळाने नोकरीवरून एक प्रकारे बडतर्फ केले आहे. यासाठी संचालक मंडळाने 'Termination for Cause' म्हणजे काही कारणास्तव कामावरून काढून टाकणे, या घटकाचा वापर केला आहे. आयसीआयसीआय बँकेने निवृत्त न्यायाधीश बी.एन.श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. समितीने सादर केलेल्या अहवालातून समोर आलेल्या माहितीत चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर दोघेही दोषी आढळले आहेत.
संचालक मंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे आता कोचर यांना सध्या व आगामी काळात बँकेकडून मिळणारे सर्व लाभ बंद होतील. यामध्ये बोनस, पगारवाढ, स्टॉक ऑप्शन, मेडिकल बेनिफिट अशा गोष्टींचा समावेश आहे. त्यांना एप्रिल 2009 ते मार्च 2018 या काळात देण्यात आलेला बोनस वसूल करण्याचा निर्णयही संचालक मंडळाने घेतला आहे. व्हिडिओकॉन ग्रुपला कर्ज देण्याचा आणि बेकायदेशीरपणे लाभ देण्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात ठेवण्यात आला आहे. व्हिडिओकॉन ग्रुपच्या पाच कंपन्यांना आयसीआयसीआय बँकने एप्रिल 2012 मध्ये 3250 कोटींचे कर्ज दिले. या कर्जाद्वारे पती दीपक कोचर यांना लाभ देण्याच्या बाबतीत त्या दोषी आढळल्या आहेत. (हेही वाचा: आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांचा राजीनामा; संदीप बक्षी घेणार जागा)
1984 साली एक मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून चंदा कोचर आयसीआयसीआय बँकेत रुजू झाल्या. त्यानंतर डेप्युटी जनरल मॅनेजर, जनरल मॅनेजर अशी पदे सांभाळत 2001 मध्ये त्या बँकेच्या कार्यकारी संचालक झाल्या. 2009 सालापासून त्यांनी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची धुरा सांभाळायला सुरुवात केली. भारत सरकारने त्यांना 2011 साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. फोर्ब्स मासिकानेही 100 शक्तिशाली महिलांमध्ये चंदा कोचर यांच्या नावाचा समावेश केला होता.