क्रिकेटपटू Shikhar Dhawan करत आहे बॉलिवूडमध्ये पदार्पण; या वर्षी प्रदर्शित होऊ शकतो पहिला चित्रपट- Reports
शिखर धवन (Photo Credit: Instagram)

आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये शानदार फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्जचा सलामीवीर शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सर्वांचा लाडका क्रिकेटपटू आता अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. पिंक व्हिलाच्या रिपोर्टनुसार, धवन मेन स्ट्रीममध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणार आहे. वृत्तानुसार, धवनने या चित्रपटाचे शूटिंगही पूर्ण केले आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप समोर आलेले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, धवन नेहमीच चित्रपट कलाकारांचा खूप आदर करतो. अशा परिस्थितीत अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवण्याची संधी मिळाल्यावर त्याने लगेच होकार दिला.

काही महिन्यांपूर्वी निर्मात्यांनी या भूमिकेसाठी शिखरशी संपर्क साधला होता. चित्रपटात धवनची पूर्ण लांबीची भूमिका आहे. बातमीनुसार, हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार आहे. आयपीएलमध्ये चमकदार फलंदाजी करणारा शिखर धवन गेल्या वर्षाच्या अखेरीस अक्षय कुमार स्टारर चित्रपट राम सेतूच्या सेटवर दिसला होता. खिलाडीशिवाय या चित्रपटात जॅकलीन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा मुख्य भूमिकेत होते. सेटवर शिखर दिसल्यानंतर तो चित्रपटाचा एक भाग असल्याच्या बातम्या आल्या होत्या. परंतु तसे नव्हते. शिखर आणि अक्षय हे जवळचे मित्र आहेत, म्हणूनच शिखर फक्त अक्षयला भेटायला चित्रपटाच्या सेटवर गेला होता.

दुसरीकडे, शिखर धवनच्या आयपीएल 2022 मधील कामगिरीबद्दल बोलायचे तर, त्याने आतापर्यंत 13 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 38.27 च्या सरासरीने आणि 122.74 च्या स्ट्राईक रेटने 421 धावा केल्या आहेत. आयपीएल 2022 मध्ये धवनने आतापर्यंत 3 अर्धशतके झळकावली आहेत. नाबाद ८८ ही त्याची या मोसमातील आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. (हेही वाचा: हॉलिवूड स्टार Stephen Fry यांची मेरीलेबोन क्रिकेट क्लबचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती)

दरम्यान, विराट कोहलीनंतर शिखर धवन आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाज आहे. शिखर धवन हा आयपीएल 2022 च्या लिलावात खरेदी केलेला पहिला खेळाडू होता. धवनला पंजाब किंग्जने मेगा लिलावात 8.25 कोटी रुपयांना विकत घेतले. धवन आयपीएलच्या शेवटच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा (DC) भाग होता.