Akshay Kumar (PC - X/ANI)

Akshay Kumar's Help to monkeys in Ayodhya: राम जन्मभूमी असलेल्या अयोध्येत (Ayodhya) दिवाळीनिमित्त (Diwali 2024) विशेष तयारी करण्यात आली आहे. यंदा इथे लाखो तेलाचे दिवे प्रज्वलित होणार आहेत. सर्वत्र याची चर्चा असताना आता अभिनेता अक्षय कुमारने (Akshay Kumar) अयोध्येमध्ये मदत जाहीर केली आहे. बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार त्याच्या उदार धर्मादाय कार्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. काही काळापूर्वी अक्षयने मुंबईतील हाजी अली दर्गासाठी 1.21 कोटी रुपये दान केले होते. आता यावेळी खिलाडी कुमारने अयोध्येच्या माकडांसाठी मदत देऊ केली आहे. अक्षय कुमारने हनुमानाच्या माकड सेनेसाठी एक कोटी रुपये दान केले आहेत. ही रक्कम माकडांना खायला देण्यासाठी वापरली जाणार आहे.

प्रभू रामाचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि भारतीय संस्कृती व पौराणिक कथांमध्ये अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या प्राण्यांचे रक्षण करण्यासाठी अभिनेत्याने हे पाऊल उचलल्याचे अहवालात म्हटले आहे. अयोध्येत हजारो माकडे आहेत. त्यांना रोज जेवण मिळावे यासाठी अक्षय कुमारने मदतीचा हात पुढे केला आहे. जगतगुरु स्वामी राघवाचार्य जी महाराज यांच्या अंजन्या सेवा ट्रस्टने अयोध्येत माकडांसाठी अन्न आणि पाण्याची व्यवस्था केली आहे. त्यांनी अक्षय कुमार या पवित्र कार्याबद्दल सांगितले, तेव्हा अक्षयने देणगी देण्याचा निर्णय घेतला. देणगी व्यतिरिक्त अक्षय कुमारने ट्रस्टला शक्य तितकी मदत देईन असेही सांगितले.

या संस्थेच्या संस्थापक विश्वस्त प्रिया गुप्ता म्हणाल्या, की अक्षयने केवळ देणगीच दिली नाही तर, त्याचे आई-वडील अरुणा भाटिया आणि हरी ओम आणि त्याचे सासरे राजेश खन्ना यांच्या नावाने सेवा करण्याविषयीही सांगितले. अक्षयला अयोध्येतील लोकांची आणि अयोध्या शहराची काळजी वाटत होती. त्यामुळे त्याने ही मदत केली व आता माकडांना खायला घालताना कोणत्याही नागरिकाला कोणतीही अडचण येणार नाही. यामुळे अयोध्येच्या रस्त्यांवर अस्वच्छता होणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत. (हेही वाचा: Kaun Banega Crorepati 16: अमिताभ बच्चन यांनी रतन टाटांसोबतच्या 'त्या' आठवणींना दिला उजाळा; टाटांच्या साधेपणाचा किस्सा एकूण उपस्थितांचे डोळे पाणावले)

दरम्यान, अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अक्षय कुमार 'सिंघम अगेन'मध्ये दिसणार आहे. रोहित शेट्टीच्या पोलीस विश्वाचा हा भाग आहे. या चित्रपटात अक्षय त्याच्या 'सूर्यवंशी'च्या भूमिकेत दिसणार आहे. त्यात अजय देवगण, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, अर्जुन कपूर, टायगर श्रॉफ, करीना कपूर खान यांचा समावेश आहे. हा चित्रपट 1 नोव्हेंबरला रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होत आहे.