महाराष्ट्रातील सामुदायिक विवाहसोहळ्यात अक्षय कुमार याची जोडप्यांना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत
अक्षय कुमार (Photo Credits: File Photo)

बॉलीवूडमधील अशी फार कमी मंडळी आहेत जी आपल्या सामजिक कार्यांसाठी लोकप्रिय आहेत, त्यातील एक नाव म्हणजे अक्षय कुमार (Akshay Kumar). अक्षय कुमार नेहमीच गरजूंना मदत करताना, सामजिक कार्यांमध्ये हिरारीने भाग घेताना दिसून येतो. आपल्या चित्रपटांमध्येही त्याने काही सामाजिक विषय हाताळले आहेत. नुकतेच त्याने पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबाना लाखो रुपयांची मदत केली. आताही अशाच एका कामामुळे अक्षय कुमार प्रकाशझोतात आला आहे. नुकतेच अक्षय कुमार याने 100 मुलींना त्यांच्या लग्नासाठी 1-1 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. अक्षयच्या या निर्णयामुळे सर्वत्र याच गोष्टीची चर्चा होताना दिसून येत आहे.

तर काही दिवसांपूर्वी अक्षयने एका सामिदायिक विवाहसोहळ्यात हजेरी लावली होती. बीड जिल्ह्यातील परळी येथे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान यांनी हा सामुदायिक विवाहसोहळा आयोजित केला होता. तिथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील उपस्थित होते. याठिकाणी गरीब अशा 100 जोडप्यांचे लग्न लागले. अक्षय याठिकाणी आपला आशीर्वाद देण्यासाठी आला होता. (हेही वाचा: शहीद जवानांच्या कुटुंबांना अक्षय कुमारची 5 कोटी मदत; बॉलीवूडच्या या कलाकारांनी दिला मदतीचा हात)

आशीर्वादासोबत अक्षयने याठिकाणी असलेल्या 100 जोडप्यांना 1-1 लाख रुपयांची मदतही केली. हे पैसे या जोडप्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. नुकतेच अक्षयने शहीद जवानांच्या कुटुंबांना 5 करोड रुपयांची मदत केली होती. तसेच ‘भारत के वीर’ या पोर्टलद्वारे कित्येक करोड रुपयेही उभे केले होते.