Rapper Badshah (Photo Credits-Instagram)

महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने (Maharashtra Police Cyber Cell) ऑनलाइन सट्टेबाजी कंपनी फेअरप्ले (FairPlay App) प्रकरणी रॅपर बादशाहवर (Rapper Badshah) कारवाई केली आहे. सायबर सेल मुंबईत रॅपर बादशाहची चौकशी करत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. बादशाहसह 40 सेलिब्रिटींनी फेअरप्ले अॅपची जाहिरात केल्याची माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार, फेअरप्लेने इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 चे स्क्रीनिंग केले होते. त्यानंतर Viacom18 ने या अॅप विरोधात तक्रार दाखल केली होती. अहवालानुसार Viacom 18 कडे आयपीएल 2023 च्या प्रसारणाचे अधिकार होते, मात्र तरीही फेअरप्लेने मार्च 2023 ते मे 2023 या कालावधीत क्रिकेट स्पर्धा आपल्या प्लॅटफॉर्मवरून प्रसारित केली.

आता महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलकडे आलेल्या तक्रारीत फेअरप्लेच्या विरोधात पायरसीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या अॅपला सपोर्ट केल्याबद्दल बादशाहला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. सोशल मीडियावर रॅपरचे अनेक व्हिडिओ देखील समोर आले आहेत ज्यात बादशाह अॅपची जाहिरात करताना झळकला आहे.

बादशाहने स्वत: त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर फेअरप्लेचा व्हिडिओ शेअर केला होता. मात्र आताच्या समन्सवर रॅपरने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. माहितीनुसार, 40 हून अधिक सेलिब्रिटींनी या अॅपची जाहिरात केली आहे. त्यापैकी काहींमध्ये कियारा अडवाणी, रणबीर कपूर, मेरी कोम, सायना नेहवाल आणि मिताली राज यांचा समावेश आहे. (हेही वाचा: SC Rejects Bail Plea of Sukesh Chandrashekhar Wife: सुकेश चंद्रशेखरच्या पत्नीचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला)

दरम्यान, फेअरप्ले अॅप हे महादेव अॅपशी लिंक आहे, ज्याचा प्रचार सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांनी केला आहे. अंमलबजावणी संचालनालय (Ed) सध्या मनी लाँड्रिंगप्रकरणी महादेव अॅपची चौकशी करत आहे. या प्रकरणी रणबीर कपूर, हुमा कुरेशी, कपिल शर्मा आणि श्रद्धा कपूरसह अनेक सेलिब्रिटींना समन्स बजावण्यात आले होते.