अभिनेत्री रेखा यांच्या सुरक्षारक्षकाला कोरोना विषाणूची लागण; BMC ने लावली नोटिस
रेखा (Photo Credits : Facebook)

प्रसिद्ध अभिनेत्री रेखा (Rekha) यांच्या सुरक्षारक्षकाला (Security Guard) कोरोना विषाणूची (Coronavirus) लागण झाली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने (BMC) रेखा यांचा मुंबईतील बांद्रा येथील बंगला सील केला आहे. तसेच त्यांच्या बंगल्याबाहेर परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषीत करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, रेखा यांच्या बंगल्याच्या सुरक्षिततेसाठी 2 गार्ड तैनात होते. परंतु, यातील एका सुरक्षारक्षकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे या सुरक्षारक्षकाला बीकेसीतील कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. अशातचं मुंबई महानगरपालिकेने रेखा यांच्या वांद्रे येथील बँडस्टँड परिसरातील ‘सी स्प्रिंग’ बंगल्याबाहेर कंन्टेनमेंट झोनची पाटी लावली आहे. (हेही वाचा - बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत च्या आठवणीत बहिण श्वेता सिंह कीर्ति ने शेअर केला भावनिक व्हिडिओ; Watch Video)

या घटनेनंतर मुंबई महानगरपालिकेने संपूर्ण परिसराला सॅनिटाइज केलं आहे. याप्रकरणी रेखा किंवा त्यांच्या प्रवक्त्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. यापूर्वी बॉलिवूडमधील करण जौहर, बोनी कपूर, अमृता अरोड़ा, सोफी चौधरी यांच्या घरातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.

भारतात कोरोना बाधित रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या देशात 8 लाखाहून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत देशात 27,114 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 8,20,916 इतकी झाली आहे.