वेडाचार: अभिनेता शाहरुखच्या चाहत्याकडून 'मन्नत'समोर स्वत:वरच ब्लेडने वार
शाहरुख खान, अभिनेता (Photo credits: IamSRK/facebook)

अभिनेता शाहरुख खानच्या एका चाहत्याने ब्लेडने वार करुन घेत स्वत:लाच जखमी करुन घेतले आहे. मोहम्मद सलीम असे व्यक्तीचे नाव असून, आपण शाहरुखचा चाहता असल्याचा त्याचा दावा आहे. शाहरुख खान याच्या 'मन्नत' या घराबाहेर शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

प्राप्त माहितीनुसार, अभिनेता शाहरुख खानने वाढदिवस आणि दिवाळीचे औचित्य साधत आपल्या घरी प्री-दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीसाठी बॉलिवूडमधील अनेक मान्यवर उपस्थित होते. यात अभिनेता आमिर खान, अर्जुन कपूर, इसान खट्टर, करीना कपूर खान, करिश्मा कपूर, कटरीना कैफ, संजय लीला भन्साळी, काजोल, मान्यता दत्त, अर्पिता खान शर्मा, अलीवरा अग्निहोत्री, जया बच्चन, श्वेता बच्चन, शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, मलायका अरोरा, तापसी पन्नू, इम्तियाज अली, शायना एनसी यांच्यासह बॉलिवूडचे अनेक दिग्गज उपस्थित होते.

दरम्यान, या वेळी शाहरुखच्या 'मन्नत'बाहेर चाहत्यांचीही मोठी उपस्थिती होती. या वेळी सलीमने अचानक ब्लेडने स्वत:वर वार करुन घेतले. हा प्रकार ध्यानात येताच पोलिसांनी सलिम याला ताब्यात घेतले. तसेच, पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याला सोडून देण्यात आले. (हेही वाचा, Zero Trailer : वाढदिवसादिवशी शाहरुख खानने दिले चाहत्यांना रिटर्न गिफ्ट, पाहा व्हिडीओ)

२ नोव्हेंबर या दिवशी शाहरुखचा वाढदिवस असतो. यंदाही तो त्याने नेहमीप्रमाणे उत्साहात साजरा केला. महत्त्वाचे असे की, वाढदिनी शाहरुखने आपल्या आगामी 'झिरो' या चित्रपटाचाही ट्रेलर लॉन्च केला.