2 नोव्हेंबर, आज शाहरुख खान आपला 53वा वाढदिवस साजरा करीत आहे. किंग खानचा वाढदिवस ही त्याच्या चाहत्यांसाठी एक मोठी पर्वणीच असते. यावर्षीदेखील आपल्या वाढदिवसानिमित्त शाहरुखने चाहत्यांसाठी एक मोठे गिफ्ट दिले आहे ते म्हणजे, त्याचा आगामी चित्रपट जीरो (zero)चा ट्रेलर आज प्रदर्शित करण्यात आला आहे.
ज्या क्षणाची सर्वांना आतुरता होती, तो क्षण शेवटी आलाच. एकीकडे आपला 53वा वाढदिवस आणि दुसरीकडे आपल्या महत्वाकांक्षी चित्रपटाचा ट्रेलर. साहजिकच या बॉलीवूडच्या बादशहासाठी आजचा दिवस अविस्मरणीय ठरला असेल. मुंबई येथे आयोजित केल्या गेलेल्या एका मोठ्या कार्यक्रमामध्ये, माध्यमांच्या समोर, चित्रपटामधील कलाकारांच्या उपस्थितीत, बॉलीवूड सेलेब्जच्या सानिध्यात मोठ्या धुमधडाक्यात या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच करण्यात आला.
जसे की आपणाला माहीतच आहे, शाहरुख या चित्रपटामध्ये एका बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारता आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुखची एक आगळेवेगळी आणि मजेशीर भूमिका आपल्याला पाहायला मिळेल. शाहरुखच्या कारकिर्दीमधील ही सर्वात आव्हानात्मक भूमिका आहे. बउआ सिंह असे या भूमिकेचे नाव असून, या चित्रपटामधील शाहरुखचा अभिनय, त्याचे संवाद, चित्रपटाचा लूक यांमुळे साहजिकच प्रेक्षकांच्या या चित्रपटाकडून असलेल्या अपेक्षा फारच उंचावल्या आहेत.
शाहरुखसोबत या चित्रपटामध्ये अनुष्का शर्मा आणि कतरीना कैफ यांसारख्या तारकादेखील आहेत. या चित्रपटामध्ये अनुष्का शर्मा एका यशस्वी अपंग महिला शास्त्रज्ञाच्या भूमिकेत दिसणार आहे. आनंद एल राय यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, शाहरुखची पत्नी गौरी खान या चित्रपटाची निर्माती आहे. हा चित्रपट 21 डिसेंबर, 2018 रोजी प्रदर्शित होत आहे.