कालच्या भागात आपण परागवर झालेले आरोप आणि त्यावर त्याचे स्पष्टीकरण पाहिलेत. दरम्यान महेश मांजरेकर परागसोबत एकांतात संवाद साधतात (इथे त्याला समज दिली जाते). त्यानंतर परत पराग सर्व सदस्यांसमोर आपले मनोगत मांडतो. यावेळी तो सर्वांची हात जोडून माफी मागतो, व पुन्हा एकदा संधी देण्याची विनंती करतो. अखेर मांजरेकर परागला बिग बॉसच्या घरात पाठवतात. घरात येऊन परत पराग प्रत्येकाला सॉरी म्हणत सर्वांना भेटतो. जेव्हा तो नेहाजवळ येतो तेव्हा ती मला तुझ्याशी बोलायचे नाही असे म्हणते. वैशालीही तिथून निघून जाते.
अखेर हीना त्याला, तू सर्वांशी व्यवस्थित राहू शकतोस का? वागू शकतोस ? असे विचारते. त्यावर पराग ‘मला थोडा वेळ द्या, मी झालेले नुकसान भरून काढेन, मला एक संधी द्या’ अशी विनंती करतो. मात्र इथे इतरांची नाही तर नेहाची आणि वैशालीची माफी मागणे गरजेचे आहे असे महेश मांजरेकर सांगतात. (घरात आल्यावर पराग नेहा आणि वैशालीशी जास्त बोलला नाही याबाबत परागला सुनावले जाते. कारण पराग हा या दोघींचा गुन्हेगार आहे.) इथे नेहा तिच्या मतावर ठाम राहते, पराग पूर्णतः खोटा आहे त्यामुळे मला त्याला माफ करायचे नाही असे सांगते.
त्यानंतर सर्वांना त्यांची मते विचारली जातात त्यावर सर्वजण, परागला माफ करू नये आणि त्याला संधी देऊ नये असे सांगतात. हे ऐकून परागची फार केविलवाणी स्थिती होते, तो सर्वांच्या मागे जातो मात्र कोणीही त्याच्याशी नीट बोलायला तयार होत नाही. त्यानंतर तो नेहाला एकट्यात बोलून तिच्यापुढे आपली व्यथा मांडतो आणि तिची माफी मागतो. इथे तो त्याची थोडी कौटुंबिक पार्श्वभूमीदेखील मांडतो. त्यानंतर घरातील सर्व सदस्य, परागला घरात ठेऊ नये असाच निर्णय घेतात. त्यानंतर पराग घरातून बाहेर पडतो (हेही वाचा: झालेल्या कृत्याबद्दल पराग कान्हेरे ने दिले स्पष्टीकरण)
त्यानंतर चुगली बूथ सुरु होते. पहिल्यांदा सुरेखा यांना नेहाने केलेली चुगली ऐकवली जाते. त्यानंतर हीनाला वीणाने केलेली चुगली ऐकवली जाते. पुढे माधवला हीनाची चुगली ऐकवली जाते. हीना त्याच्याबद्दल तो घरात राहण्यास अपात्र आहे असे म्हटल्याने त्याला थोडे वाईट वाटते. त्यानंतर वीणा ला ती आणि शिव बद्दल केलेली चुगली ऐकवली जाते. पुढे नेहा आणि अभिजितला किशोरी त्यांचा ग्रुप तोडायचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले जाते.
त्यानंतर बिग बॉसची एक बाहेरची चाहती स्वर्ग आणि नरक या टास्कसाठी शिवला आणि सुरेखा यांना आरोपी ठरवते. त्यावर शिक्षा म्हणून सुरेखा सुरेख लावणी सादर करतात. एलीमेशन प्रक्रिया सुरु होते. सर्वांना टेन्शन देऊन, सर्वांची उत्सुकता ताणून धरली जाऊन शेवटी या आठवड्यात घरात कोणीच जाणार नसल्याचे सांगितले जाते.