'उझडा चमन' की 'बाला': बॉलीवूडमध्ये सुरु झालाय नवा वाद; दोन 'टकले' उभे ठाकलेत एकमेकांसमोर
Battle Of Balds | (Picture Credit: Instagram)

बॉलीवूडमध्ये वाद काही नवीन नाहीत. दोन नायकांमधला किंवा नायिकांमधला वाद हा जुना आहे. परंतु या वेळी वाद झाला आहे 2 टकल्यांमध्ये. चकित झालात ना? खरं तर हा वाद आहे 2 चित्रपटांमधला. उझडा चमन  (Ujda Chaman)आणि बाला  (Bala) हे चित्रपट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

27 मे ला अमर कौशिक (Amar Kaushik) दिग्दर्शित बाला  या चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं आणि आयुष्मान खुराणाच्या (Ayushman Khurana) 'टकल्या' लूकमुळे उत्सुकता निर्माण झाली. हा चित्रपट 22 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार होता. पण गेल्या आठवड्यात उझडा चमनचा ट्रेलर आला आणि बालाच्या निर्मात्यांना धक्का बसला. कारण या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये दिसणाऱ्या कथानकात आणि बाला च्या कथानकात बऱ्यापैकी साम्य आहे. ऐन तारुण्यात डोक्यावरचं 'छप्पर' उडाल्या कारणाने येणाऱ्या अडचणी आणि लग्न जुळवताना होणार त्रास, हा उझडा चमनचा विषय आहे. (हेही वाचा. सैफ अली खान पुन्हा एकदा वेब सिरीजमध्ये, अली अब्बास झफरसोबत करणार 'तांडव')

अभिषेक पाठक दिग्दर्शित हा चित्रपट 8 नोव्हेंबर ला प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये 'टकल्याची पहिली आणि खरी फिल्म' अशी ओळ लिहून त्यांनी नकळत बाला  वर निशाणा साधला. मग बाला  च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अलीकडे करत 7 नोव्हेंबर हि ठेवली आणि 'बाला  आता लवकर येत आहे'  असं कॅप्शनही दिलं. त्यामुळे आता हे दोन्ही चित्रपट एकाच आठवड्यात, एका दिवसाच्या फरकाने प्रदर्शित होत आहेत. दोन्ही चित्रपटांच्या पोस्टरमध्येही बरंच साम्य आहे. आता या दोन टकल्या हिरोंपैकी कोणता हिरो बाजी मारतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

उझडा चमन  मध्ये सनी सिंग, मानवी गगरु हे मुख्य भूमिकेत आहेत, तर बाला  मध्ये आयुष्मान खुराणा सोबतच भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) आणि यामी गौतम (Yami Gautam) यांच्या मुख्य भूमिका आहेत.