कमालिस्तान स्टुडिओ (संग्रहित-संपादित प्रतिमा)

नुकतीच प्रसिद्ध आरके स्टुडीओची (R.K. Studios) मालकी गोदरेजला देण्यात आली असून, त्या जागी आता अलिशान घरे उभा राहणार असल्याची बातमी आली होती. या बातमीमुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली होती. आता असाच तब्बल 60 वर्षे जुना अंधेरी येथील अमरोही स्टुडीओ म्हणजेच कमालिस्तान स्टुडिओ (Kamalistan Studios) जमीनदोस्त होणार आहे. या जागी देशातील सर्वात मोठे कॉर्पोरेट ऑफिस पार्क उभे राहणार आहे. डी.बी. रियल्टी (DB Realty) आणि बंगळुरूस्थित आरएमझेड कॉर्पोरेशन यांनी या जागेची खरेदी केल्याचे वृत्त आहे.

प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि मीना कुमारी यांचे पती कमाल अमरोही यांनी 1958 साली या स्टुडीओची उभारणी केली होती. तब्बल 15 एकरमध्ये पसरलेला हा स्टुडीओ कमाल अमरोही यांचे पुत्र ताजदार अमरोही (Tajdar Amrohi) सांभाळत होते. पाकीझा, रजिया सुल्तान (1983), अमर अकबर अँथनी (1977), कालिया (1981), खलनायक (1993), कोयला (1997) आणि अलीकडील दबंग 2 अशा चित्रपटांचे शुटींग या ठिकाणी झाले आहे.

(हेही वाचा: आर. के. स्टुडिओजमधील काही जागा राज कपूर यांच्या म्यूझियमसाठी राखीव ठेवावी, IFTDA यांची गोदरेज प्रॉपर्टीज यांना अपील)

दरम्यान, या ठिकाणी उभा राहणारा प्रकल्प हा तब्बल 21 हजार कोटींचा असल्याचे समजत आहे. सध्या या ठिकाणी अनेक मालिका, जाहिराती आणि डॉक्युमेंट्री यांचे शुटींग चालू असते. कमालिस्तान स्टुडिओ हा भारतातील सर्वात आयकॉनिक असा दुसरा स्टुडिओ आहे.