दिवाळी म्हटलं की उत्साह, धुमाकूळ, जल्लोष. तसाच उत्साह चित्रपट निर्मात्यांमध्ये सुद्धा असतो. दर वर्षी दिवाळीत आपला चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी मोठ्या मोठ्या निर्मात्यांमध्ये चढाओढ लागलेली असते. या वर्षी सुद्धा काही मोठे सिनेमे दिवाळीत प्रदर्शित होत आहेत.
1. हिरकणी (Hirkani)
ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला हा चित्रपट. शिवकालीन इतिहास उलगडणाऱ्या चित्रपटांच्या गौरवशाली परंपरेत अजून एक नाव. एका आईच्या धाडसाची, निश्चयाची, पराक्रमाची गाथा. हिरकणीची कथा तर प्रत्येकालाच लहान असल्यापासून ठाऊक असते. पण आता ही कथा मोठ्या पडद्यावर बघताना जास्त मजा येणार आहे. ती भव्यता, ती साहसगाथा अनुभवता येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले आहे. सोनाली कुलकर्णीने यात हिरकणीची भूमिका साकारली आहे.
2. ट्रिपल सीट (Triple Seat)
गेल्या काही वर्षात 'रॉमकॉम' या जॉनरमध्ये अनेक दर्जेदार मराठी चित्रपट आले आहेत. अजून एक चित्रपट यात आता एन्ट्री घेत आहे. 'ट्रिपल सीट' या चित्रपटात अंकुश चौधरी वायरलेस प्रेमाची गोष्ट सांगणार आहे. पल्लवी पाटील आणि बिग बॉस फेम शिवानी सुर्वे सुद्धा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. प्रेमाच्या त्रिकोणात बांधल्या गेलेल्या या पात्रांचा काय गोंधळ होतो हे बघणं सुद्धा रंजक ठरेल. याचे दिग्दर्शन संकेत प्रकाश पावशे याने केले आहे.
3. हाऊसफुल्ल 4 (Housefull 4)
बऱ्याच दिवसापासून चर्चेत असलेला अक्षय कुमारचा हा चित्रपट आज प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. हाऊसफुल्ल ही सिरीजची कथा म्हटलं की गोंधळ आलाच. याही चित्रपटात असाच सावळागोंधळ पाहायला मिळणार आहे. 1419 आणि 2019 अशा दोन काळांमध्ये घडणारी पुनर्जन्माचीही कथा. जेव्हा अक्षय कुमारला आधीच्या जन्मातल्या गोष्टी आठवू लागतात तेव्हा काय धमाल उडते ही याची उर्वरित कथा. बरेच कलाकार असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन फरहाद समजी याने केले आहे. (हेही वाचा. दिवाळीची खास मेजवानी; Colors Marathi Award 2019: 'सोहळा कुटुंबाचा, आपल्या माणसांचा')
4. सांड की आंख (Saand ki Aankh)
सर्वात वयोवृद्ध शार्प शूटर्स ठरलेल्या चंद्रो तोमर म्हणजेच शूटर दादी आणि प्रकाशी तोमर म्हणजेच रिव्हॉल्वर दादी या उत्तर प्रदेश मधील दोघींची कथा म्हणजे हा चित्रपट. 60 व्या वर्षानंतर शार्प शूटिंग शिकल्यावर चंद्रो तोमर यांनी 30 तर प्रकाशी तोमर यांनी 25 राष्ट्रीय पदकं पटकावली आहेत. या चित्रपटात तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहेत. याचे दिग्दर्शन तुषार हिरानंदानी याने केले आहे.