दिवाळीची खास मेजवानी; Colors Marathi Award 2019: 'सोहळा कुटुंबाचा, आपल्या माणसांचा'
Colors Marathi Awards 2019 (Photo Credits: File Image)

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर कलर्स मराठी घेऊन येत आहे पहिलावहिला कुटुंब सोहळा म्हणजेच 'कलर्स मराठी अवॉर्ड 2019'. कलर्स मराठीवर (Colors Marathi) सुरू असलेल्या मालिकांद्वारे व्यक्तिरेखांच्या वेगवेगळ्या छटा, विविधरंगी कार्यक्रम प्रेक्षकांना बघायला मिळत आहे... कधी रंग निस्वार्थी प्रेमाचा तर कधी रंग भक्तीचा, कधी कुटुंबाचा - अभिमानाचा तर कधी हास्याचा... कलर्स मराठीवरील सगळेच कार्यक्रम लोकप्रिय आहेत, त्यांनी प्रेक्षकांच्या मनामध्ये अढळ स्थान निर्माण केले आहे... 'घाडगे & सून' मधील अमृता आणि अक्षयची जोडी, बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेमुळे बाळुमामा हे आता केवळ दक्षिण महाराष्ट्राचं दैवत नव्हे तर तमाम महाराष्ट्राचं श्रध्दास्थान बनलं आहे आणि अवघा महाराष्ट्र 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' या जयघोषाने दुमदुमला आहे, 'जीव झाला येडापिसा' मालिकेमधील सिध्दी आणि शिवा, 'स्वामिनी' मालिकेतील गोपिकाबाईंचा धाक तर रमाचा निरागस स्वभाव, पेशवाईचे देखणे रूप, 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' मधील सिध्दार्थ आणि अनु ज्यांच्या प्रेमळ नात्याने आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये घर केलं या सगळ्यावर प्रेक्षक मनापासून प्रेम करत आहेत.

तर 'सूर नवा ध्यास नवा' अशा कथाबाह्य कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्रासमोर एक सुरेल मैफल दर आठवड्याला सादर केली आणि प्रेक्षकांनी त्याला भरघोस प्रतिसाद देखील दिला. तर 'एकदम कडक' सारख्या कार्यक्रमाने महाराष्ट्रातील कलाकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी हक्काचा मंच दिला. 'बिग बॉस मराठी' सारख्या कार्यक्रमाने अनेक कलाकारांना नव्याने ओळख मिळून दिली. आता याच आणि इतर लोकप्रिय कार्यक्रमांना आणि त्यातील कलाकारांना सर्वोत्कृष्ट ठरवण्याचा, त्यांचे कौतुक करण्याचा सोहळा पार पडणार आहे. ज्यामध्ये लोकप्रिय नायक-नायिका, लोकप्रिय जोडी, लोकप्रिय कुटुंब, लोकप्रिय भावंडं, लोकप्रिय सासू-सासरे, लोकप्रिय आई-वडील, लोकप्रिय नकारात्मक स्त्री आणि पुरूष व्यक्तिरेखा, लोकप्रिय सहाय्यक स्त्री आणि पुरूष व्यक्तिरेखा, लोकप्रिय शीर्षकगीत, लोकप्रिय सूत्रसंचालक, लोकप्रिय कथाबाह्य कार्यक्रम, लोकप्रिय मालिका या विभागांचा समावेश आहे. (हेही वाचा. Colors Marathi Awards 2019: पहा कलाकारांचा हा हटके Red Carpet लुक या क्षणचित्रांतून)

कलर्स मराठीच्या पहिल्या अवॉर्ड सोहळ्यामध्ये लोकप्रिय मालिकेच्या स्पर्धेत श्री लक्ष्मीनारायण, घाडगे अँड सून, बाळूमामाच्या नावानं चांगभलं, जीव झाला येडापिसा, स्वामिनी आणि सुखाच्या सरींनी हे मन बावरे या मालिकांमध्ये तर लोकप्रिय कथाबाह्य कार्यक्रमामध्ये सूर नवा ध्यास नवा, बिग बॉस मराठी, एकदम कडक, नवरा असावा तर असा, अस्सल पाहुणे इरसाल नमुने आणि महाराष्ट्र जागते रहो यामध्ये चुरस रंगणार आहे. तर नायक या विभागामध्ये सिद्धार्थ, बाळूमामा, शिवा, माधवराव, अक्षय आणि नारायण तर नायिकेच्या विभागामध्ये अनु, सत्यव्वा, सिध्दी, रमा, अमृता आणि लक्ष्मी यांच्यामधून लोकप्रिय नायक, नायिकेची निवड होणार आहे.

या सोहळ्याचे सुत्रसंचालन कलर्स मराठीच्या परिवारातील सदस्य आपल्या सगळ्यांच्या आवडत्या आत्याबाई म्हणजेच चिन्मयी सुमित आणि लाडका अभिनेता सुमित राघवन या सोहळ्यात नात्याचे विविध रंग भरणार आहेत.  कलर्स मराठी अवॉर्ड २०१९: 'सोहळा कुटुंबाचा, आपल्या माणसांचा' हा सोहळा 27 ऑक्टोबर दुपारी 12 वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.