ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडने IPO साठी बाजार नियामक सेबीकडे ड्राफ्ट पेपर जमा केले आहेत. या माध्यमातून कंपनीला शेअर बाजाराद्वारे 25 हजार कोटींचे भांडवल उभे करायचे असल्याचे सांगितले जात आहे. मनीकंट्रोल वृत्त संकेतस्थळाने याबाबतचे वृत्त दिले आहे. ह्युंदाई मोटर इंडियाचा IPO हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO असेल, असे सांगितले जात आहे. यापूर्वी 2.7 अब्ज डॉलरच्या किमतीचा सर्वात मोठा भारतीय जीवन विमा निगम अर्थात LIC चा IPO 2022 साली आला होता. ह्युंदाई मोटर इंडियाची पालक कंपनी असलेल्या ह्युंदाई मोटरकडून हा IPO ऑफर फॉर सेलच्या स्वरुपात असणार आहे. (हेही वाचा - Satellite Internet in India: लवकरच Mukesh Ambani भारतात सुरु करणार सॅटेलाइट इंटरनेट सेवा; Jio Platforms ला मिळाली भारतीय अंतराळ नियामकाकडून मंजुरी)
या आयपीओसाठी ह्युंदाईकडून सिटी, एचएसबीसी सिक्युरिटीज, जेपी मॉर्गन, कोटक महिंद्रा कॅपिटल आणि मॉर्गन स्टॅनली या बँकांना सल्लागार म्हणून निवडले गेले आहे. शार्दूल अमरचंद मंगलदास या विधी संस्थेला कायदेशीर कामासाठी नेमण्यात आले आहे. याअंतर्गत 10 रुपयांचे दर्शनी मूल्य असलेले 14 कोटी 21 लाख 94 हजार 700 शेअर विकले जाणार आहेत. मनी कंट्रोल या वेबसाईटने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
देशात प्रवाशी वाहन विक्रीमध्ये ह्युंदाई मोटर इंडिया आर्थिक वर्ष 2024 मध्ये सर्वाधिक वाहन विक्री करणारी दुसऱ्या क्रमाकांची मोठी कंपनी ठरली. मागच्या सहा महिन्यात ह्युंदाईच्या प्रतिस्पर्धी मारूती सुझुकी इंडियाच्या शेअरमध्ये 24.35 टक्क्यांची वाढ झाली आहे. ऑटोकोर प्रोफेशनलच्या माहितीनुसार, ह्युंदाई मोटर इंडियाने वर्ष 2023 या आर्थिक वर्षात 60 हजार कोटींची उलाढाल केली. तर 4653 कोटींचा नफा कमवला.