वाहन खरेदी होणार आणखी स्वस्त?; अर्थसंकल्पात GST 28 वरून 18 टक्के होण्याची शक्यता
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI/File)

एकीकडे भारताची तंत्रज्ञान क्षेत्रात होत असलेली प्रगती ऑटो (Auto) क्षेत्रासाठी फायद्याची ठरत असलेली दिसत आहे. मात्र दुसरीकडे कार विक्रीमध्ये बरीच घट होत असलेली जाणवत आहे. सध्या कार खरेदीवर असलेला 28 टक्के जीएसटी (GST) हे देखील यामागचे करण असू शकते. याच बाबतीत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. वाहन खरेदीवरील जीएसटी 28 टक्क्यावरून 18 टक्के करण्याचा विचार केला जात आहे. जुलै महिन्यात नवीन सरकार आपला अर्थसंकल्प (Budget) सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात ही घोषणा केली जाऊ शकते.

वाहननिर्मात्यांची संघटना सियाम यांची केंद्रीय अधिकाऱ्यांशी बैठक झाली, यामध्ये या 18 टक्के जीएसटी बाबत चर्चा झाली. सियामने केलेली ही मागणी जर का सरकारने मान्य केली तर वाहनाच्या किंमती बऱ्याच कमी होऊ शकतात. सध्या प्रवासी वाहनांच्या विक्रीत 17.07 टक्के घट झाली आहे. मागील 8 वर्षात ही सर्वात मोठी घट आहे. ऑटो सेक्टर पुन्हा तेजीत यावा यासाठी सरकारने काही पावले उचलणे गरजेचे आहे, त्यासाठी जीएसटी कमी करणे हा चांगला उपाय ठरू शकतो.

दरम्यान, सध्या वाहनांमुळे होत असलेले प्रदूषण पाहता, जुनी वाहने निकालात काढावी. तसेच देशातील वाहन उद्योगाला चालना मिळावी यासाठी संपूर्ण आयत होणाऱ्या वाहनांचा सीमा शुल्क 25 टक्क्यावरून वाढवून 40 टक्के करावा अशी मागणीही करण्यात आली आहे.