हवामान बदल हे जगासाठी आणि मानवी जीवनासाठी मोठे आव्हान बनत चालले आहे. याला सामोरे जाण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नात एका अमेरिकन व्यावसायिकाने आपली संपूर्ण संपत्ती दान करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. पॅटागोनिया (Patagonia) या अमेरिकेतील कपड्यांच्या व्यवसायाचे संस्थापक, यव्हॉन चौइनार्ड (Yvon Chouinard) आपला संपूर्ण व्यवसाय, आपली कंपनी हवामान बदलाविरुद्धच्या लढाईसाठी दान करत आहेत.
सुमारे 50 वर्षांपूर्वी त्यांनी हा व्यवसाय सुरू केला होता. कंपनीचा सर्व कॉर्पोरेट महसूल हा हवामान बदलाशी लढा देण्यासाठी, जैवविविधता आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी कार्य करणारे कार्यक्रम आणि गटांना दान केले जाईल. चौईनार्ड यांच्यासोबत, त्यांची पत्नी आणि दोन मुले देखील याच कारणासाठी कंपनीतील त्यांचा संपूर्ण हिस्सा दान करत आहेत. न्यूयॉर्क टाइम्सच्या मते, कंपनीचे मूल्य सुमारे $3 अब्ज आहे.
चौइनार्ड यांनी आपल्या निर्णयाचे स्पष्टीकरण देणारे एक पत्र लिहिले, ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘आता पृथ्वीच आमचा एकमेव भागधारक आहे.’ हे पत्र बुधवारी पॅटागोनिया कंपनीच्या वेबसाइटवर पोस्ट करण्यात आले. त्यांनी लिहिले की, ‘जर आपली पृथ्वी सुधारण्याच्या काही आशा असतील, तर आपल्याकडे असलेली सर्व संसाधने कामी येतील. आपण हे करू शकतो.’
ते पुढे म्हणाले, ‘पर्यावरणाच्या संकटाचा सामना करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, परंतु ते पुरेसे नाही. कंपनीची मूल्ये जपत संकटाचा सामना करण्यासाठी अधिक पैसे गुंतवण्याचा मार्ग शोधावा लागेल. म्हणूनच जो पर्याय समोर दिसला तो म्हणजे पॅटागोनिया विकणे आणि सर्व पैसे दान करणे.’ (हेही वाचा: पुरामुळे पाकिस्तानातील मृतांचा आकडा 1,400 च्या पुढे; आधीच कंगाल झालेल्या अर्थव्यवस्थेचे 40 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त नुकसान)
दरम्यान, यव्हॉन चौइनार्ड एक उद्योगपती तसेच पर्यावरणवादी म्हणून ओळखले जातात. त्यांनी 1973 मध्ये पॅटागोनियाची स्थापना केली. त्यांची पॅटागोनिया ही कंपनी पर्यावरण संरक्षणासाठीही ओळखली जाते. यव्हॉन यांच्या कंपनीची स्थापना झाल्यानंतर सात वर्षांनी कंपनीच्या उत्पन्नातील एक टक्का पर्यावरण वाचवण्यासाठी गेला होता. या दरम्यान, 140 दशलक्ष डॉलर्सची रक्कम दान करण्यात आली.