जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती जपानच्या केन तनाका (Kane Tanaka) यांचे वयाच्या 119 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर आता फ्रान्सच्या (France) ल्युसिल रेंडन (Lucile Randon) म्हणजेच सिस्टर आंद्रे जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती (Oldest Known Person) बनल्या आहेत. त्यांचे वय 118 वर्षे 73 दिवस आहे. केन यांचा जन्म 2 जानेवारी 1903 रोजी नैऋत्य जपानच्या फुकुओका भागात झाला होता. त्याच वर्षी, राइट बंधूंनी प्रथमच त्यांच्या स्वत: च्या विमानातून उड्डाण केले आणि मेरी क्युरी नोबेल पारितोषिक मिळविणारी पहिली महिला ठरल्या होत्या.
केन तनाका यांचे 19 एप्रिल 2022 रोजी निधन झाले. त्यानंतर सिस्टर आंद्रे सर्वात वृद्ध व्यक्ती ठरल्या आहेत. त्याच्यानंतर पोलिश महिलेचा क्रमांक लागतो, ज्यांचे वय 115 वर्षे आहे. आयडीएलचे संगणक शास्त्रज्ञ लॉरेंट टॉसेंट यांनी ही माहिती दिली. 11 फेब्रुवारी 1904 रोजी दक्षिण फ्रान्समध्ये जन्मलेल्या सिस्टर आंद्रेचे खरे नाव ल्युसिल रेंडन आहे. पहिल्या महायुद्धाच्या दशकभरापूर्वी, सिस्टर आंद्रे भूमध्य सागरी किनाऱ्यावर असलेल्या एका नर्सिंग होममध्ये आनंदी जीवन जगत होत्या.
या कामगिरीबद्दल आंद्रे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही त्यांना अभिनंदनाचे पत्र पाठवले आहे. डॉटर्स ऑफ चॅरिटीची धार्मिक शपथ घेण्यापूर्वी, लुसिली रेंडन या पॅरिसमध्ये प्रशासक म्हणून काम करायच्या. होम्स कम्युनिकेशन्सचे संचालक डेव्हिड टवेला यांनी सांगितले की, जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचा किताब मिळाल्याने आंद्रे यांना खूप आनंद झाला आहे. सध्या त्यांना कमी दिसते परंतु तरी त्यांना जीन क्लेमेंटचा विक्रम मोडायचा आहे. (हेही वाचा: जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती Kane Tanaka यांचे जपानमध्ये निधन; वयाच्या 119 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)
जीन कॅलमेंट या फ्रान्सच्या रहिवासी होत्या, ज्या 1997 मध्ये मरण पावल्या. त्यांचे वाय 122 वर्षे असल्याचे सांगितले जाते. जपानमध्ये जगातील सर्वात वृद्ध लोकसंख्या आहे. जपानमध्ये सुमारे 28 टक्के लोकसंख्या 65 किंवा त्याहून अधिक आहे.