World's Oldest Person Dies: जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती Kane Tanaka यांचे जपानमध्ये निधन; वयाच्या 119 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Kane Tanaka (संग्रहित संपादित प्रतिमा)

जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती केन तनाका (Kane Tanaka) यांचे जपान (Japan) येथे निधन झाले आहे. वयाच्या 119 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. केन तनाका यांचा जन्म 2 जानेवारी 1903 रोजी नैऋत्य जपानच्या फुकुओका भागात झाला होता. त्याच वर्षी राईट बंधूंनी प्रथमच विमान उडवले होते आणि मेरी क्युरी नोबेल पारितोषिक जिंकणारी पहिली महिला ठरली होती. अलीकडेपर्यंत तनाका यांची तब्येत उत्तम होती व त्या एका नर्सिंग होममध्ये राहत होत्या.

तरुणपणात तनाका यांनी नूडलचे दुकान आणि तांदळाच्या केकचे दुकान असे अनेक व्यवसाय केले. त्यांनी एका शतकापूर्वी 1922 मध्ये हिदेओ तनाकाशी लग्न केले व चार मुलांना जन्म दिला आणि पाचवे दत्तक घेतले. 2021 मध्ये टोकियो ऑलिम्पिकसाठी टॉर्च रिलेमध्ये भाग घेण्यासाठी त्यांनी व्हीलचेअर वापरण्याची योजना आखली होती, परंतु साथीच्या रोगाने त्याची योजना प्रत्यक्षात येऊ दिली नाही.

जेव्हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने 2019 मध्ये त्यांना ‘जगातील सर्वात वयस्कर जिवंत व्यक्ती’चा पुरस्कार दिला तेव्हा त्या 116 वर्षांच्या होत्या. तेव्हा त्यांना विचारण्यात आले की त्यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण कोणता? त्यावर त्यांनी उत्तर दिले होते, ‘हा सध्याच्या क्षण’. कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात, तनाका यांचा कुटुंबातील सदस्यांशी संपर्कही लक्षणीयरीत्या कमी झाला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्या बोलू शकत नव्हत्या व त्यामुळे हावभावांच्या मदतीने संवाद साधायच्या.

केन तनाका यांच्या मृत्यूबाबत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने ट्विट केले की, ‘केन तनाका यांचे वयाच्या 119 व्या वर्षी निधन झाल्याचे कळवताना आम्हाला दुःख होत आहे. केन या जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती होत्या. त्या 122 वर्षांच्या वयापर्यंत जगलेली जीन लुईस कॅलमेंट (Jeanne Louise Calment) यांच्यानंतरच्या आतापर्यंतच्या दुसऱ्या सर्वात वृद्ध व्यक्ती होत्या.’

जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार, जपानमध्ये जगातील सर्वात वृद्ध लोकसंख्या आहे. जपानमध्ये सुमारे 28 टक्के लोकसंख्या 65 किंवा त्याहून अधिक आहे. गिनीजने सत्यापित केलेली सर्वात वृद्ध जिवंत व्यक्ती फ्रेंच महिला जीन-लुईस कॅलमेंट, ज्या 1997 मध्ये 122 वर्षे आणि 164 दिवसांच्या वयात मरण पावल्या.