2020 मध्ये संपूर्ण जगामध्ये कोरोना विषाणूने (Coronavirus) हाहाकार माजवला होता. याचा सर्वात फटका बसला तो पर्यटन व्यवसायाला. अनेक देशांनी विमानांच्या उड्डाणांवर निर्बंध घातल्याने लोकांचा प्रवास थांबला होता. मात्र 2021 मध्ये यामध्ये शिथिलता आणली गेली आहे, त्यामुळे लोकांच्या परदेशवाऱ्या वाढल्या आहेत. आता पासपोर्टबाबत (Passports) जागतिक क्रमवारी समोर आली आहे व यामध्ये पुन्हा जपानने (Japan) बाजी मारली आहे. जपानचे लोक तब्बल 191 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात, अशाप्रकारे जपानचा पासपोर्ट देशात सर्वात शक्तिशाली पासपोर्ट (World's Most Powerful Passports) ठरला आहे. 2021 हेनली पासपोर्ट निर्देशांक (2021 Henley Passport Index) मधून ही माहिती समोर आली आहे.
गेल्या चार वर्षांपासून जपान या क्रमवारीत प्रथम स्थानावर आहे. या यादीत सिंगापूर दुसर्या क्रमांकावर आहे. या देशात राहणारे लोक 190 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात. या यादीत जर्मनी आणि दक्षिण कोरिया यांचा तिसरा क्रमांक आहे. दोन्ही देशांमधील लोक 189 देशांमध्ये व्हिसा-शिवाय प्रवास करू शकतात. या यादीत चौथ्या क्रमांकावर चार देश आहेत. इटली, फिनलँड, लक्झेंबर्ग आणि स्पेन. या देशांमध्ये राहणारे लोक 188 देशांमध्ये प्रवास करू शकतात.
या यादीमध्ये ऑस्ट्रिया आणि डेन्मार्क पाचव्या स्थानावर आहेत आणि या देशांतील लोक 187 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात. सहाव्या स्थानावर फ्रान्स, आयर्लंड, नेदरलँड्स, पोर्तुगाल आणि स्वीडन हे पाच देश आहेत. या सर्व देशांतील लोक 186 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवासाचा आनंद घेऊ शकतात. हेनली पासपोर्ट रँकिंग ही आंतरराष्ट्रीय हवाई परिवहन संघटनेच्या आकडेवारीवर आधारित आहे. मात्र, या वर्षाच्या क्रमवारीत कोरोना विषाणूच्या साथीमुळे बर्याच देशांमधील प्रवासावरील तात्पुरती निर्बंध समाविष्ट केली नाहीत.
या व्यतिरिक्त बेल्जियम, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, झेक प्रजासत्ताक, ग्रीस, माल्टा, कॅनडा, हंगेरी, नॉर्वे, स्वित्झर्लंड, ब्रिटन आणि यूएसए सारख्या देशांचा समावेश या यादीत पहिल्या दहा क्रमांकामध्ये आहे. सात वर्षापूर्वी अमेरिका या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर होती, परंतु आता हा देश सातव्या क्रमांकावर घसरला आहे. (हेही वाचा: US: डोनाल्ड ट्रंम्प यांनी अखेर मानला पराभव, 20 जानेवारीला नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांना सत्ता हस्तांतरित करणार)
या यादीमध्ये भारताला 85 वे स्थान मिळाले असून, भारतीय लोक 58 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात. पाकिस्तानसघा या यादीमध्ये 107 वा क्रमांक असून, पाकिस्तानी लोक फक्त 32 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात. या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण यादी.