World's Largest Cruise Ship: जगातील सर्वात मोठे क्रूझ जहाज 'Icon of The Seas' प्रवासासाठी सज्ज; टायटॅनिकपेक्षा 5 पट मोठे, समोर आली पहिली झलक (See Photos)
Icon of the Seas (संग्रहित संपादित प्रतिमा)

World's Largest Cruise Ship: जगातील सर्वात मोठे क्रूझ जहाज, आयकॉन ऑफ द सीज (Icon Of The Seas) हे 27 जानेवारी रोजी त्याच्या मेगा पदार्पणापूर्वी समुद्रात उतरले आहे. हे क्रूझ जहाज 23 डिसेंबर रोजी स्पॅनिश बंदर अल्गेसिरास येथून निघाले होते आणि आता अंतिम तपासणीसाठी 2 जानेवारी रोजी कॅरिबियनमध्ये पोहोचले. वृत्तानुसार, पोन्स, पोर्तो रिको येथील स्थानिक आणि अभ्यागतांना या महाकाय जहाजाची झलक देण्यात आली. ही क्रूझ टायटॅनिकपेक्षा 5 पट मोठी आहे आणि ती तयार करण्यासाठी $2 अब्ज खर्च आला आहे. हे एक नवीन जहाज आहे जे 9 जानेवारी रोजी मियामी येथे पोहोचणार आहे.

रॉयल कॅरिबियन इंटरनॅशनलचे 'आयकॉन ऑफ द सीज' हे परफेक्ट हॉलिडे डेस्टिनेशन क्रूझ जहाज म्हणून वर्णन केले आहे. लहान मुलांपासून तरूणांपर्यंत, वृद्धांपर्यंत आणि ज्यांना आपल्या कुटुंबासोबत फिरायला जायला आवडते, अशा सर्व लोकांसाठी याची खास रचना करण्यात आली आहे. यात वॉटर पार्कपासून साहसी खेळ, पूल, पब, बार आणि रेस्टॉरंटपर्यंत सर्व काही आहे. या क्रूझमध्ये 5,610 लोक आणि 2,350 क्रू सामावून घेण्याची क्षमता आहे. (हेही वाचा: Japan Plane Fire Inside Video: विमानाला आग लागल्याने टोकियो येथील हनेडा विमानतळावर आणीबाणी, व्हिडिओ व्हायरल)

जगातील सर्वात मोठे क्रूझ जहाज 'आयकॉन ऑफ द सीज' 1200 फूट लांब आहे. त्याचे अंदाजे वजन 2,50,800 टन आहे. हे महाकाय जहाज युरोपीय देश फिनलँडमध्ये तयार करण्यात आला आहे. यामध्ये 7 रात्रीच्या मुक्कामासह अनेक पॅकेजेस उपलब्ध आहेत. या क्रूझवर 7 पूल आणि एकूण सहा वॉटर-स्लाईड आहेत.

या सर्वात मोठ्या आलिशान क्रूझ जहाजात सर्व सुविधांची संपूर्ण व्यवस्था आहे. प्रत्येक वर्ग आणि वयोगटातील लोकांना लक्षात घेऊन त्याची रचना करण्यात आली आहे. यामध्ये जोडपी, अविवाहित लोक, आणि मोठ्या कुटुंबासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. ही लक्झरी क्रूझ मियामीमध्ये त्यांचा प्रवास सुरू करेल आणि बहामा, मेक्सिको, होंडुरास सेंट पीटर्सबर्गसह बंदरांसह पूर्व किंवा पश्चिम कॅरिबियनमध्ये प्रवास सुरु ठेवेल. या क्रूझ जहाजाची अनेक वेळा चाचणी घेण्यात आली आहे. गेल्या वर्षी 22 जून रोजी त्याची पहिली चाचणी घेण्यात आली होती. पहिल्या चाचणीत, मुख्य इंजिन, ब्रेक सिस्टम, स्टीयरिंग, आवाज आणि कंपन पातळी या सर्वांची चाचणी घेण्यात आली.