Finland People | प्रातिनिधिक प्रतिमा | संग्रहित संपादित प्रतिमा

फिनलंड (Finland) हा जगातील सर्वात आनंदी/सुखी देश असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या, World's Happiest Countries 2022 अहवालात समोर आले आहे. फिनलंडला सलग पाचव्यांदा हे विजेतेपद मिळाले आहे. अहवालानुसार, अफगाणिस्तान हा जगातील सर्वात दुःखी देश असल्याचे समोर आले आहे. अफगाणिस्ताननंतर लेबनॉनचा नंबर लागतो. लेबनॉन हा आर्थिकदृष्ट्या गरीब देश आहे. ‘जागतिक आनंद अहवाल’ हा लोकांच्या स्वतःच्या आनंदाचे मूल्यांकन तसेच आर्थिक आणि सामाजिक डेटावर आधारित आहे. गेली दहा वर्षी हा अहवाल प्रसिद्ध होत आहे.

हा अहवाल तीन वर्षांच्या कालावधीतील सरासरी डेटावर आधारित, शून्य ते 10 स्केलवर मांडण्यात येतो. युक्रेनवर रशियन आक्रमणापूर्वीच्या डेटावर आधारीत ही आवृती आहे. या यादीमध्ये फिनलंडनंतर डेन्मार्क दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्यानंतर आइसलँड तिसऱ्या क्रमांकावर आहे. स्वित्झर्लंड, नेदरलँड्स आणि लक्झेंबर्ग 4 ते 6 क्रमांकावर आहेत. स्वीडन आणि नॉर्वे अनुक्रमे सातव्या आणि आठव्या स्थानावर आहेत. इस्त्राईल 9 व्या क्रमांकावर आहे आणि न्यूझीलंड 10 व्या क्रमांकावर आहे. पुढे 11 ते 20 क्रमांकावर अनुक्रमे ऑस्ट्रिया, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, जर्मनी, कॅनडा, युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंगडम, झेकिया (चेक प्रजासत्ताक), बेल्जियम आणि फ्रान्स हे देश आहेत.

सर्बिया, बल्गेरिया आणि रोमानियामध्ये लोकांच्या वेलबिइंगमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. या यादीमध्ये सर्वात मोठी घसरण लेबनॉन, व्हेनेझुएला आणि अफगाणिस्तानमध्ये झाली. आर्थिक मंदीचा सामना करत असलेला लेबनॉन 146 देशांच्या निर्देशांकात झिम्बाब्वेच्या खाली शेवटून दुसऱ्या स्थानावर आहे. (हेही वाचा: Pakistan दिवाळखोरीच्या वाटेवर; देशात फक्त 5 दिवस पुरेल इतकाच डिझेलचा साठा)

दरम्यान, एखादा देश आनंदी, सुखी किंवा समाधानी आहे का नाही हे ठरवण्यासाठी, 6 मानकांवर प्रश्न तयार केले जातात. त्यामध्ये, संबंधित देशातील प्रति व्यक्तीचा जीडीपी, सामाजिक सहयोग, औदार्य आणि भ्रष्टाचार, सामाजिक स्वातंत्र्य व निरोगी जीवन यांचा समावेश आहे.