इम्रान खान (Photo Credit : Youtube)

युक्रेन-रशिया युद्धादरम्यान पाकिस्तान (Pakistan) कंगाल होण्याच्या मार्गावर पोहोचला आहे. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती खराब असल्याची माहिती जगजाहीर आहेच, आता देशात डिझेलचा (Diesel) मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. पाकिस्तानात फक्त पाच दिवस पुरेल इतकाच डिझेलचा साठा शिल्लक असल्याची बातमी आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत, त्याचा फटका पाकिस्तानलाही बसला आहे. एक्सप्रेस ट्रिब्यून वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिले आहे.

अहवालानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे पाकिस्तानला पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा जाणवत आहे. सध्या त्यांच्याकडे केवळ पाच दिवसांचा डिझेलचा साठा शिल्लक आहे. पाकिस्तानी बँकांनी तेथील तेल कंपन्यांनाही उच्च जोखमीच्या श्रेणीत ठेवले आहे. बँकांनी या कंपन्यांना आणखी कर्ज देण्यास नकार दिला आहे.

16 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान सरकारने पेट्रोलियम पदार्थांच्या किमती प्रति लिटर 10 ते 12 रुपयांनी वाढवल्या होत्या. पाकिस्तान सरकारच्या अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पेट्रोलचे दर प्रति लीटर 12.03 रुपये आणि हायस्पीड डिझेलच्या दरात 9.53 रुपये प्रति लिटरने वाढ करण्यात आली आहे. याशिवाय लाईट डिझेल तेलाच्या दरात प्रतिलिटर 9.43 रुपयांनी तर रॉकेलच्या दरात 10.08 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. (हेही वाचा: रशियाने चीनकडे मागितले हत्यारबंद Drone, अमेरिकेसह जगभरातील देशांची चिंता वाढली)

पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीत नव्याने वाढ केल्यानंतर पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे दर 147.82 रुपये प्रति लिटरवरून, 159.86 रुपये प्रति लीटर झाले आहेत. हायस्पीड डिझेलची किंमतही 144.622 रुपयांवरून 154.15 रुपये प्रति लीटर झाली आहे. याशिवाय लाईट डिझेल तेलाची किंमत प्रतिलिटर 114.54 रुपयांवरून 123.97 रुपये, रॉकेलची किंमत 116.48 रुपये प्रति लिटरवरून 126.56 रुपये प्रतिलिटर करण्यात आली आहे. पेट्रोलियम पदार्थांच्या किमती गगनाला भिडल्यानंतर पाकिस्तान सरकारवर जोरदार टीका होत आहे.