Portugal Wildfire: पोर्तुगालमध्ये जंगलात आग, 1,400 लोकांचे स्थलांतर
Wildfire | Representational image (Photo Credits: pxhere)

पोर्तुगालमध्ये दक्षिणेकडील भागात जंगलाला लागलेल्या आगीने (Wildfires in Portugal) रौद्र रुप धारण केले आहे. या वनव्यामुळे आग मोठ्या प्रमाणावर भडकली असून हजारो हेक्टर जमीन जळून खाक झाली आहे. आगीमुळे धोका उत्पन्न झालेल्या परिसरातून सुमारे 1400 नागरिकांनी आतापर्यंत स्थलांतरन केले आहे. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार 850 हून अधिक अग्निशामक आणि सहा जल-बॉम्बिंग विमानांद्वारे वणव्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोर्तुगालच्या अलेन्तेजो प्रदेशातील ओडेमिरा नगरपालिका हद्दीत सुरुवातील आग शनिवारी भडकली. तेव्हापासून हा वनवा पुढे पसरला. पोर्तुगालच्या प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या अल्गार्वेच्या दक्षिणेकडे ही आग पसरत आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

अतिशय उच्च तापमान आणि वेगाने वाहणारे वारे आदींमुळे आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण होऊन बसत आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश न आल्याने आतापर्यंत सुमारे 6,700 हेक्टर जमीन आणि त्यावरील वनसंपत्ती नष्ट झाली आहे. आपत्कालीन आणि नागरी संरक्षण प्राधिकरणाचे कमांडर जोस रिबेरो म्हणाले की, हवामानाची परिस्थिती आव्हानात्मक आहे. सोमवारी सूर्यास्तावेळीही ही आग कायमहोती. त्यामुळे ओडेमिरामधील आकाश धुराने काळवंडून गेले. (हेही वाचा, Australia Bushfire: वणवा नव्हे! ऑस्ट्रेलियातील जंगलाला जाणीवपूर्वक लावली आग; पोलिसांकडून 200 जणांवर गुन्हे दाखल, सरकारची महत्त्वपूर्ण कारवाई)

दरम्यान, पोर्तुगालसारखे दक्षिण युरोपीय देश उन्हाळी पर्यटन हंगामात विक्रमी तापमानाचा सामना करत आहेत. ज्यामुळे अधिकाऱ्यांना आरोग्य धोक्यांचा इशारा देण्यात आला आहे. अभ्यासकांचे म्हणणे आहे की हवामानातील बदलामुळे उष्णतेच्या लाटा अधिक वारंवार, तीव्र आणि सर्व ऋतूंमध्ये पसरत आहेत. अधिकाऱ्यांनी लिस्बन, अलेन्तेजो आणि अल्गार्वेसह पोर्तुगालमधील 120 हून अधिक नगरपालिकांना जंगलातील आगीचा सर्वाधिक धोका असल्याचे घोषित केले आहे.