Israel-Palestine War Escalates: इस्त्रायलकडून हमासला प्रत्युत्तर, 230 पॅलेस्टिनी ठार; PM Netanyahu यांचा गंभीर इशारा, Gaza Strip खाली करण्याचे आदेश
Israel-Palestine War | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

हमास (Hamas) या दहशतवादी गटाने केलेल्या हल्ल्याची परिणीती इस्त्रायल-पॅलेस्टाईन युद्ध (Israel-Palestine War) वाढण्यात झाली आहे. दहशतवादी गटाच्या आगळीकीला इस्त्राइलनेही चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. ज्यात जवळपास 230 पॅलिस्टीनी (Palestinians) मारले गेल्याचे वृत्त आहे. दरम्यान, पंतप्रधान नेत्यानाहू (PM Benjamin Netanyahu) यांनीही समोरील राष्ट्राला जोरदार इशारा देत गाझा पट्टी (Gaza Strip) रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रदेशातील नागरिकांनीही काही काळ सुरक्षीत ठिकाणी स्थानांतर करावे असे नेत्यानाहू यांनी म्हटले आहे.

हमासच्या रॉकेट गोळीबार आणि जमिनीवरील हल्ल्यातील मृतांचा आकडा 300 च्या वर गेला असताना, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी रविवारी गंभीर इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, इस्त्राईलविरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवादी संघटनेची सर्व ज्ञात ठिकाणे "भंगारात" बदलली जातील. ही आमची शपथ आहे. दरम्यान त्यांनी गाझामधील सर्व रहिवाशांना काही निघून जाण्याचा इशारा दिला. तसेच हमासची क्षमता नष्ट करण्यासाठी देश त्वरित सर्व शक्ती पणाला लावेल असा विश्वासही त्यांनी जनतेला दिला.

हमासने केलेल्या हल्ल्यात इस्त्रायलला नागरिकांच्या मृत्यूच्या रुपात मोठी किंमत मोजावी लागली आहे. त्यामुळे इस्त्रायलही हमासला जोरदार प्रत्युत्तर देताना दिसत आहे. अल जजीरा या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहीनीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, मध्य पूर्वेकडील देशात अभूतपूर्व जमिनीवर झालेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात रविवारी गाझामधील पॅलेस्टिनी एन्क्लेव्हमध्ये किमान 232 लोक ठार झाले आहेत.

हमासने शनिवारी (7 ऑक्टोबर) रोकेट गोळीबार करत इस्त्रायलवर मोठा हल्ला केला. पाठिमागील काही वर्षांमध्ये या देशावर झालेला (पॅलिस्टीन समर्थकांकडून) झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. हमासने इस्त्राईलच्या दक्षिण भागात काही ठिकाणी घुसखोरी केल्याचेही वृत्त आहे.

इस्त्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांनी हमासवरील हल्ल्याबाबत बोलताना सांगितले की, इस्रायल संरक्षण दल (आयडीएफ) देशाच्या नागरिकांच्या संरक्षणासाठी सदैव्य तत्पर आहे. ज्या ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या सर्व ठिकाणी सैनिक जात आहेत. घरोघरी जाऊन नागरिकांची विचारपूस करत आहेत तसेच, परिसरातील दहशतवाद्यांचा पूर्ण बिमोड करुनच परतत आहेत.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर आपल्या अधिकृत हँडलवर नेतान्याहू यांनी एका पोस्टद्वारे म्हटले आहे की, हमासच्या क्षमता नष्ट करण्यासाठी IDF ताबडतोब आपली सर्व शक्ती वापरेल. आम्ही त्यांना नष्ट करू आणि त्यांनी इस्रायल राज्यावर जबरदस्तीने केलेल्या या काळ्या दिवसाचा आम्ही बदला घेऊ. दरम्यान, इस्त्रायलवर झालेल्या हल्ल्याचा जगभरातील अनेक देशांनी निषेध केला आहे.