Walmart Layoffs: वॉलमार्टमध्ये पुन्हा एकदा मोठी नोकरकपात; शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढले जाणार- Reports
Walmart Layoffs

Walmart Layoffs: जगभरात 2024 मध्ये टेक, फिनटेक, ईव्ही, ऑटोमोबाईल, आरोग्य तंत्रज्ञानसह इतर अनेक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नोकर कपात सुरु आहे. आता अमेरिकेतील लोकप्रिय डिस्काउंट स्टोअर चेन वॉलमार्टने (Walmart) पुन्हा एका टाळेबंदी सुरु केली आहे. वॉलमार्ट शेकडो कॉर्पोरेट नोकऱ्या कमी करत आहे, तसेच काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. कंपनीने रिमोट लोकेशनवरून काम करणाऱ्या बहुतेक कामगारांना इतर कार्यालयात जाण्यास सांगितले आहे.

वॉल स्ट्रीट जर्नलने अहवाल दिला की, जगातील सर्वात मोठा किरकोळ विक्रेता आणि अमेरिकेतील सर्वात मोठा खाजगी नियोक्ता समजल्या जाणाऱ्या वॉलमार्टने बे एरिया, विस्कॉन्सिन आणि मिलवॉकी या तीन टेक हबमधील कामगारांना देखील इतर ठिकाणी स्थलांतर होण्यास सांगितले आहे. कंपनीने ऑटोमेशन प्लॅन स्वीकारल्यामुळे टाळेबंदी लागू करण्यात आल्याचे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. अहवालानुसार, डॅलस, अटलांटा आणि टोरंटोमधील लहान कार्यालयातील कर्मचाऱ्यांना वॉलमार्टच्या बेंटोनविले, अर्कान्सास येथील कॉर्पोरेट मुख्यालयासारख्या मोठ्या केंद्रांमध्ये जाण्याची विनंती केली जात आहे.

वॉलमार्ट यूएस मध्ये सुमारे 4,600 स्टोअर चालवते. कंपनीने एप्रिल 2023 मध्ये सांगितले होते की, 2026 पर्यंत त्यांचे 65% स्टोअर ऑटोमेशनद्वारे सर्व्हिस केले जातील. तेव्हापासून वॉलमार्ट आपला आकार कमी करत आहे. बिझनेस इनसाइडरच्या अहवालानुसार, वॉलमार्टने 2024 मध्ये 8 यूएस स्टोअर्स/ऑफिस बंद करण्यास सुरुवात केली आहे. कॅलिफोर्नियामधील 4, ओहायोमधील एक आणि मेरीलँडमधील आणखी एक स्टोअर बंद झाल्यानंतर, कंपनीने विस्कॉन्सिन आणि कॅलिफोर्नियामध्ये वॉलमार्टच्या टाळेबंदीची नोटीस दाखल केली आहे.

अहवालानुसार, वॉलमार्टने म्हटले आहे की, आर्थिक अपेक्षा पूर्ण होत नसल्याने ते त्यांची दुकाने आणि कार्यालये बंद करत आहेत. मात्र कंपनीने आश्वासन दिले आहे की, कंपनी Walmart.com द्वारे डिलिव्हरी पर्यायाच्या माध्यमातून लोकांना सेवा देत राहील. कंपनीच्या निवेदनानुसार वॉलमार्टच्या टाळेबंदीमुळे प्रभावित झालेल्या कामगारांना कंपनींच्या इतर वेगवेगळ्या ठिकाणी बदली करण्याची संधी मिळेल. (हेही वाचा: Apple’s Next CEO: ॲपलचे सीईओ Tim Cook लवकरच निवृत्त होण्याची शक्यता; John Ternus ला मिळू शकते कंपनीची कमान)

युनायटेड स्टेट्समध्ये, वॉलमार्टची फेब्रुवारी 2024 पर्यंत सुमारे 2.1 दशलक्ष कामगार असलेली सुमारे 4,600 स्टोअर्स होती. यामध्ये 3,560 सुपरस्टोअर्स, 360 डिस्काउंट स्टोअर्स आणि 675 इतर मार्केट स्टोअर्सचा समावेश होता. कंपनीकडे सुमारे 600 सॅम्स क्लब्सची मालकी असल्याचे सांगण्यात येत आहे. महत्वाचे म्हणजे जानेवारीमध्ये, वॉलमार्टने आगामी पाच वर्षांत 150 पेक्षा जास्त स्टोअर्स वाढवण्याचा किंवा तयार करण्याचा मानस ठेवला होता, ज्यामध्ये फायदा होण्याची शक्यता असलेल्या 14 नवीन स्थानांचा समावेश होता.