रशियात (Russia) 23 वर्षे सत्तेत राहिल्यानंतर आता राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (President Vladimir Putin) यांना सर्वात गंभीर धोका निर्माण झाला आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. वॅग्नर ग्रुप (Wagner Group) या खाजगी लष्करी संस्थेने सरकार उलथून टाकण्याच्या उद्देशाने रशियामध्ये पुतीन विरुद्ध सशस्त्र बंडखोरी सुरु केली आहे. वॅग्नर ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन (Yevgeny Prigozhin) यांनी देशाचे नेतृत्व काढून टाकण्याची धमकी देखील दिली. येवगेनी प्रिगोझिन यांनी रशियामध्ये नवीन अध्यक्ष स्थापित करण्याचा आपला इरादा जाहीर केला आहे. रशियामध्ये वॅग्नर ग्रुपच्या सैनिकांच्या बंडानंतर परिस्थिती चिंताजनक बनली आहे.
बंडाची घोषणा झाल्यानंतर लगेचच, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या कृत्याचा निषेध केला. व्लादिमीर पुतिन यांनी वॅग्नर ग्रुपच्या खाजगी सैन्याचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांच्या सशस्त्र बंडाची घोषणा ही, ‘विश्वासघात’ आणि ‘रशियाच्या पाठीत वार’ असल्याचे म्हटले आहे.
पुतिन यांनी वॅग्नर ग्रुपने लष्कराविरुद्ध केलेली कारवाई देशद्रोह असल्याचे सांगत, परिणामांना सामोरे जाण्याची धमकी दिली आहे. मात्र पुतीन यांच्या धमकीने वॅग्नर गटाचा राग आणखीनच भडकला आहे. या दरम्यान मॉस्कोमध्ये सर्वाधिक तणाव पसरला आहे. ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने गुप्तचर माहितीचा हवाला देत म्हटले आहे की, प्रीगोझिनच्या नेतृत्वाखालील खाजगी सैन्य मॉस्कोच्या दक्षिणेस 1,000 किलोमीटरहून अधिक अंतरावर असलेल्या रोस्तोव-ऑन-डॉन शहरात पोहोचले आहे. याच शहरातून रशिया युक्रेनमधील लष्करी कारवाई करत आहे.
वॅग्नर ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या सत्तापालटाची घोषणा करणारा संदेश जारी केला आहे. दुसरीकडे, रशियन संरक्षण विभागाने प्रिगोझिनच्या अटकेसाठी वॉरंट जारी केले आहे. विशेष बाब म्हणजे आतापर्यंत प्रिगोझिन हे व्लादिमीर पुतिन यांचे विश्वासू होते, पण आता त्यांच्या सैन्याने पुतिन यांच्या सत्तेविरुद्ध बंड केले आहे. येवनेगी प्रिगोझिन यांनी म्हटले आहे की, त्यांच्या नेतृत्वाखाली 25,000 सैनिक आहेत आणि ते सर्व न्यायासाठी लढण्यासाठी कटिबद्ध आहेत. (हेही वाचा: Wagner Mercenary Group द्वारा कथीतरित्या पाडलेल्या Russian Helicopte चा फोटो प्रसिद्ध)
प्रिगोझिनचे सैनिक युक्रेनमध्ये रशियन सैन्यासह लढत आहेत. परंतु सध्या या बंडाचा नेमला उद्देश काय आहे हे स्पष्ट नाही, परंतु हा उठाव प्रिगोझिनच्या रशियन लष्करी नेत्यांशी संघर्ष वाढवण्याचे संकेत देतो, ज्यांच्यावर प्रीगोझिन यांनी युक्रेनमध्ये युद्ध घडवून आणल्याचा आणि प्रदेशातील सैन्य कमकुवत केल्याचा आरोप केला आहे. येवगेनी यांनी त्यांच्या टेलिग्राम चॅनेलवर शेअर केलेल्या निवेदनात, भ्रष्टाचार, फसवणूक आणि नोकरशाहीने ग्रासलेल्या राष्ट्राला सहन करण्यास त्यांनी नकार दिल्याचे सांगितले. प्रिगोझिन म्हणाले, ‘हा लष्करी उठाव नाही, तर न्यायासाठीची मोहीम आहे.’ रशियन सरकारने युक्रेनमधील वॅग्नरच्या छावण्यांना रॉकेट, हेलिकॉप्टर आणि तोफखान्याने लक्ष्य करण्याचे आदेश दिले आहेत.