USA Gold Card

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (President Donald Trump) यांनी गुरुवारी, 3 एप्रिल रोजी त्यांचे शाही विमान 'एअर फोर्स वन' मध्ये पत्रकारांना गोल्ड कार्ड (USA Gold Card) दाखवले. या कार्डची किंमत सुमारे 43 कोटी रुपये आहे. या कार्डवर डोनाल्ड ट्रम्पचा फोटो आहे, म्हणूनच त्याला ट्रम्प कार्ड असेही म्हटले जात आहे. त्यांनी गेल्या महिन्यात हे कार्ड जाहीर केले होते. हे कार्ड श्रीमंत म्हणजेच कोट्याधीश स्थलांतरितांसाठी आहे. म्हणजेच, ज्यांना जे लोक हे कार्ड विकत घेतील त्यांना अमेरिकन नागरिकत्व मिळेल. 'ट्रम्प्स गोल्ड कार्ड' हे ग्रीन कार्डचे प्रीमियम आवृत्ती आहे. ते स्थलांतरितांना ५ दशलक्ष डॉलर्सना विकले जाईल. त्यांनी म्हटले होते की, हे कार्ड नागरिकत्व मिळवण्याचा सोपा मार्ग असेल आणि श्रीमंत लोक हे कार्ड खरेदी करून आपल्या देशात राहू शकतील.

ट्रंप यांचे म्हणणे आहे की, ही कार्ड योजना अमेरिकेची अर्थव्यवस्था बळकट करेल आणि देशावरील कर्जाचा बोजा कमी करेल. या कार्डाची घोषणा फेब्रुवारी 2025 मध्ये प्रथम झाली होती, आणि आता ते 17 एप्रिल 2025 पर्यंत उपलब्ध होईल. या योजनेचा उद्देश EB-5 व्हिसा कार्यक्रमाची जागा घेणे आहे, ज्यामध्ये विदेशी गुंतवणूकदारांना $1 मिलियन गुंतवणुकीवर ग्रीन कार्ड मिळत होते. गोल्ड कार्ड अधिक महाग आहे, आणि ते थेट $5 मिलियन गुंतवणूक मागते, आणि त्यातून मिळणारा निधी देशाच्या विकासासाठी वापरला जाईल, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. हे कार्ड केवळ ग्रीन कार्डचे विशेष अधिकारच प्रदान करणार नाही, तर श्रीमंत स्थलांतरितांना अमेरिकेत गुंतवणूक करण्याची संधी देखील प्रदान करेल.

वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी सांगितले की, मार्च 2025 च्या शेवटी एकाच दिवसात 1 हजार कार्ड विकले गेले, ज्यामुळे $5 बिलियन (सुमारे 4,150 कोटी रुपये) जमा झाले. या कार्डासाठी अर्ज करणाऱ्यांची कडक तपासणी होईल, जेणेकरून फक्त ‘जागतिक दर्जाचे’ आणि कायदा पाळणारे लोकच यात सहभागी होतील. ट्रम्प यांनी स्वतः हे कार्ड एक ‘क्रांतिकारी पाऊल’ असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांनी या योजनेचे कौतुक करताना सांगितले की, ही एक अभूतपूर्व संधी आहे, जी श्रीमंत आणि यशस्वी लोकांना अमेरिकेत आणेल. असे श्रीमंत लोक अमेरिकेत नोकऱ्या निर्माण करतील आणि कर भरतील. त्यांनी स्वतः हे पहिले कार्ड खरेदी केल्याचा दावाही केला. (हेही वाचा: Turmp Tariffs: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून लवकरच Pharma Tariffs जाहीर होणार असल्याची घोषणा)

USA Gold Card: 

मात्र ही योजना सादर झाल्यापासून त्यावर बरीच टीका होत आहे. त्याच दिवशी, 3 एप्रिलला, ट्रम्प यांनी नवीन शुल्क (टॅरिफ) धोरण जाहीर केले, ज्यामुळे शेअर बाजारात मोठी घसरण झाली आणि आर्थिक चिंता वाढली. काही तज्ज्ञांचे मत आहे की, ही योजना कायदेशीर अडचणींमुळे अंमलात येणे कठीण आहे, कारण अशा मोठ्या बदलासाठी अमेरिकन काँग्रेसची परवानगी आवश्यक आहे. दरम्यान, अनेक भारतीय उद्योजक आणि गुंतवणूकदारांना अमेरिकेत जाण्याची इच्छा असते. पण $5 मिलियन ही रक्कम सामान्य भारतीयांसाठी खूप मोठी आहे, त्यामुळे ही योजना फक्त श्रीमंतांसाठीच मर्यादित राहील, असे दिसते. ट्रम्प यांचे हे गोल्ड कार्ड अमेरिकेच्या नव्या आर्थिक दिशेचे प्रतीक आहे का, की फक्त एक वादग्रस्त निर्णय? हे येणारा काळच ठरवेल. तोपर्यंत, हे कार्ड आणि त्यामागची कल्पना जगभर चर्चेचा विषय ठरली आहे.