Odisha Train Accident | (Photo Credits: ANI/ Twitter)

युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाचे राष्ट्राध्यक्ष जो बाइडेन (US President Joe Biden) यांनी भारतात झालेल्या रेल्वे अपघाताबद्दल (Train Crash in Odisha) तीव्र शोक व्यक्त केला आहे. ओडिशा राज्यातील बालोसेर (Balasore ) जिल्ह्यात झालेल्या रेल्वे अपघातात शेकडो प्रवासी मृत्यूमुखी पडले. या अपघातामुळे अवघे जग हादरून गेले. या घटनेनंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी 'व्हाइट हाऊस' येथून प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात ओडिशा राज्यातील बालासोर जिल्ह्यात झालेल्या रेल्वे अपघाताबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. 'अत्यंत हृदयद्रावक' अशा शब्दात जो बाइडेन यांनी आपला शोक व्यक्त केला आहे.

बालासोर जिल्ह्यात झालेल्या तीन रेल्वे गाड्यांचा अपघात हा भारतातील जवळपास तीन दशकांतील सर्वात भीषण रेल्वे अपघातांपैकी एक आहे. किमान 288 लोक मरण पावले आहेत आणि 1,100 हून अधिक जखमी झाले आहेत. (हेही वाचा, Odisha Train Accident: LIC ने बालासोर दुर्घटनेतील पीडितांसाठी जाहीर केल्या अनेक सवलती; क्लेम सेटलमेंटला आणणार गती)

जो बाईडेन यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतातील प्राणघातक रेल्वे अपघाताच्या दु:खद बातमीने आपण दु:खी झालो आहोत. ज्यांनी प्रियजन गमावले आहेत आणि ज्यांना या भीषण अपघातात दुखापत झाली आहे त्यांच्यासाठी आमच्या प्रार्थना आहेत. ही एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे.

बाइडेन यांनी आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, युनायटेड स्टेट्स आणि भारत यांच्यातील संबंध हे कौटुंबीक आणि संस्कृतीच्या नातेसंबंधात खोलवर रुजलेले बंध आहेत. जे आपल्या दोन राष्ट्रांना एकत्र करतात. त्यामुळे संपूर्ण अमेरिकेतील लोक भारतातील नागरिकांसोबत शोक व्यक्त करतात. परिस्थिती पूर्ववत होईतोवर आम्ही भारतीयांच्या सोबत आहोत.

ट्विट

दरम्यान, बालासोर येथे परिस्थिती पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर भारतीय रेल्वेचे जवान, मजदूर सक्रीयझाले आहेत, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाने एका ट्विटद्वारे दिली. रेल्वे मंत्रालय परिस्थितीवर बारीक लक्ष ठेऊन असल्याचेही म्हटले आहे.

दरम्यान, दक्षिण पूर्व रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी आदित्य कुमार चौधरी यांनी एएनआयला सांगितले की, खराब झालेल्या ट्रॅकवरील वाहतूक लवकरच पूर्ववत केली जाईल. ही वाहतूक पूर्ववत करण्यासाठी संपूर्म टीम कामात व्यग्र आहे. आम्ही लवकरात लवकर वाहतूक पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत आहोत.

या दुर्घटनेच्या प्राथमिक अहवालात म्हटले आहे की, बालासोर जिल्ह्यातील बहनगा बाजार स्थानकावर बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस, कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी या तीन वेगवेगळ्या ट्रॅकवर तीन मार्गांचा अपघात झाला. शुक्रवारी सायंकाळी झालेल्या या अपघातात या दोन पॅसेंजर गाड्यांचे तब्बल 17 डबे रुळावरून घसरले असून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.